सायकलचा पंचर ते जेसीबी 'दुरुस्त' करणारा अवलिया 'ऑल राऊंडर मिस्त्री'...!, आकस्मिक निधनाने कुदनूर पंचक्रोशी हळहळली - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2023

सायकलचा पंचर ते जेसीबी 'दुरुस्त' करणारा अवलिया 'ऑल राऊंडर मिस्त्री'...!, आकस्मिक निधनाने कुदनूर पंचक्रोशी हळहळली

सिद्धाप्पा नागोजी नौकुडकर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        सन १९७५ पासून घरच्या गरिबीमुळे उपजीविकेसाठी कुदनूर गावातील एका घराच्या ओसरीवर सायकल पंचर काढण्याचे काम करणारा मुलगा सिद्धाप्पा नागोजी नौकुडकर ते 'सिध्दू मिस्त्री' यांचा गेल्या ४७ वर्षातील प्रवास थक्क करणारा आहे. शिकलेल्या बड्या-बड्या मिस्त्रींना अशक्यप्राय वाटणारी कामे लिलया करण्याची त्यांची बुद्धिमत्ता सर्वांना अक्षरशः चक्रावून टाकणारी होती. बुधवार दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री साडेअकरा वाजता कुदनूर, ता. चंदगड येथील राहत्या घरी वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कर्यात भागातील सर्व प्रकारच्या वाहनधारक व ग्राहकांच्या मनात घर केलेल्या या 'ऑलराऊंडर' मिस्त्री विषयी थोडेसे....

       घरच्या गरिबीने  इयत्ता तिसरीतच त्यांचे शिक्षण सोडवले. वयाच्या १४-१५ व्या वर्षी त्यांनी पक्कड, पाणा, स्क्रू ड्रायव्हर हाती घेतला, तो अखेरच्या श्वासापर्यंत. सन १९७५ च्या आसपास जेव्हा कर्यात भागात साध्या खडीचे सुद्धा रस्ते नव्हते अशा काळात सायकलींची संख्या मोजकीच, त्यामुळे दुरुस्तीसाठी येणारे ग्राहकही अपवादानेच. म्हणून सिद्धू मिस्त्री कधी रिकामी थांबले नाहीत. त्या काळात उजेडासाठी वापरली जाणारी रॉकेल वर चालणारी गॅस बत्ती, स्टोव्ह दुरुस्ती करता करता ते रेडिओ, टेपरेकॉर्डर, भिंतीवरील व हातातील घड्याळांचे मिस्त्री कधी झाले हे कळले नाही. 

       १९८०-९० च्या दशकात त्यांचे भाडोत्री सायकल दुकानही शाळकरी मुलांच्यात 'प्रसिद्ध' होते. हळूहळू काळ बदलला रेडिओ, टेप, घड्याळे, सायकली, स्टोव्ह, गॅस बत्ती कालबाह्य होऊ लागले, तर  स्कूटर, मोटरसायकल, जीप, कार, ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो, जेसीबी, पोकलेन अशी स्वयंचलित व मोठी वाहने परिसरात दिसू लागली.  तथापि यांचा एकही विशेषज्ञ मिस्त्री भागात नव्हता. पण अशी बंद पडलेली वाहने चालवायची कशी..? या विचारातच असे यंत्र व वाहनधारक रात्री- अपरात्री सिद्धू मिस्त्री यांचा दरवाजा ठोठावू लागले. पण आपल्याला यातील काही कळत नाही, असे समोरच्या ग्राहकाला त्यांनी आयुष्यात कधीच सांगितले नसेल. 

        आपल्या परीने व अक्कल हुशारीने ते मोटरसायकल पासून मोठ- मोठी यंत्रेही दुरुस्त करून द्यायचे. सन २००० च्या दरम्यान कालकुंद्री ताम्रपर्णी नदीतील नाव गंजून नादुरुस्त झाली होती. ती दुरुस्त करण्यासाठी कोल्हापूरला नेणे गरजेचे होते. ही गोष्ट सिद्धू मिस्त्री यांना समजताच त्यांनी ही नाव कुदनूर मध्येच पूर्ण पत्रा बदलून    दुरुस्त करून दिली होती. तेव्हा माझ्यासारखे लोक म्हणायचे की "सिद्धू मिस्त्री यांच्याकडे नाददुरुस्त झालेले विमान, रेल्वे, किंवा समुद्रातील बोट जरी आणून दिली तरी ते दुरुस्त करून देतील." यावरून त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येईल. 

       ते इलेक्ट्रिक वेल्डिंग, गॅस वेल्डिंग कामाबरोबरच पाणी खेचणारे इंजिन, मोटर पंप, जनरेटर सारखी यंत्रे एवढेच नव्हे तर ट्रॅक्टरचे नांगर, कुळव, मळणी यंत्रे, बैल औतांचे लोखंडी नांगर, कुळव, कोळपे, पेरणी यंत्र सुद्धा दुरुस्त करून द्यायचे. एकदा ट्रकचा पंचर काढताना टायर मधील लोखंडी डिक्स उडाली व त्यांचा हात मनगट व कोपराच्या मध्ये पूर्ण मोडला होता. अशावेळी त्यांना तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात हलवले. पण तेथेही डॉक्टरला साहेब मला दोन-तीन दिवसात यातून बरे करा! 

     माझे ग्राहक तिकडे वाट पाहत आहेत, त्यांच्या कामाचा खोळंबा होतो. असे सांगणारा कर्यात भागातील लोकांना २४ तास उपलब्ध होणारा 'ऑल राउंडर' मिस्त्री कोणाच्या ध्यानीमनी नसताना अचानकपणे या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण करून काळाच्या पडद्याआड गेला. त्यांचा एकूणच जीवनपट चंदगड तालुक्यातील लोकांसाठी एक दंतकथा बनून राहील यात शंका नाही. त्यांना कर्यात भाग व चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित चंदगड लाईव्ह न्युज तथा CL News च्या वाचकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली...!

      त्यांच्या पश्चात पत्नी, ई- सेवा केंद्र चालक मुलगा नागेश नौकुडकर, सून, दोन विवाहित मुली, नातवंडे, विवाहित भाऊ असा परिवार आहे.

शब्दांकन : श्रीकांत वैजनाथ पाटील (पत्रकार), कालकुंद्री ता. चंदगड.

No comments:

Post a Comment