सायकलिंग करत कन्याकुमारी येथे पोहचलेले पूणे येथील सायकल पट्टू |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
वेडात मराठे वीर दौडले सात या वाक्याला अनुसरून, सर्व सायकल स्वारांसाठी एक स्वप्न असणारी पुणे ते कन्याकुमारी ही १६०० किलोमीटर ची लांब पल्ल्याची सायकल राईड अवघ्या ८ दिवसात यशस्वी रित्या पूर्ण केली.
यामध्ये युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संदीप परदेशी, प्रशांत सगरे, प्रवीण जगदाळे, चैतन्य वंजारे, आनंद गुंजाळ आणि रणजीत सिंग या सात सायकल स्वारानी सहभाग घेतला.
मोहिमेची सुरुवात इंडो अथेलेटिक सोसायटी पुणे च्या ऑफिस पासून दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ३ वाजता करण्यात आली. यामध्ये इंडो अथलेटिक सोसायटी चे गणेश भुजबळ, प्रदीप टाके, संतोष नखाते, गिरीराज उमरीकर, बाळासाहेब तांबे, कैलास तापकीर हेमंत दांगट यांनी निशाण दाखवून सुरुवात केली.
पुण्याहून निघाल्यापासून कागल येथे २६५ किलोमीटर चा पहिला टप्पा, कागल पासून बेळगाव मार्गे येल्लापुर येथ पर्यंत २२५ किलोमीटर चा दुसरा टप्पा, त्यानंतर गोकर्ण महाबळेश्वर दर्शन घेऊन मुरूडेश्वर येथे २०० किलोमीटर चा तिसरा टप्पा, मुरुडेश्र्वर ते उडपी येथ पर्यंतचा चौथा टप्पा, तेथून कुंनुर पर्यंतचा १७५ किलोमीटर चा पाचवा टप्पा, त्यानंतर थालसेरी मार्गे दक्षिण द्वारका म्हणून ओळखले जाणारे गुरुवायुर येथ पर्यंत १८० किलोमीटर चा सहावा टप्पा, सातव्या दिवशी समुद्रकिनारा अनुभव घेत आलप्पी येथे १५० किलोमीटर अंतर कापले. त्यानंतर थिरूअनंतपुरम येथे स्वामी पद्मनाभ दर्शन घेऊन कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद स्मारक येथे पर्यंत शेवटचा १६०० किमी चा टप्पा पार केला.
यामध्ये सर्वांनी अगोदर पासून नियमित व्यायाम व सायकलिंग चा सराव केला. कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्यावर कशा पद्धतीने मात करायची याची पूर्ण तयारी अगोदर पासून करण्यात आली. सर्व टीम मेंबरनी पूर्णपणे सहकार्य केल्यामुळे ही मोहीम यशस्वी रित्या पूर्ण करू शकतो असे मोहिमेचे लीडर युवराज पाटील यांनी सांगितले.
मोहिमेविषयी बोलताना संदीप परदेशी व प्रशांत सगरे म्हणाले की, घाट आणि दिवसभरात गाठायचे अंतर याचे नियोजन करणे आणि प्रत्यक्षात ते कृतीत आणणे हे अवघड काम होते. पण सर्वांनी खूपच मेहनत घेतल्यामुळे कोणतीही अडचण आली नाही. येलापुरला पोचण्यासाठी दांडेली च्या जंगलातून जावे लागते. येथे हत्ती व जंगली प्राण्यांचा वावर असतो. आम्हाला हल्ल्याळ येथे पोहोचण्यासाठी संध्याकाळचे आठ वाजले होते. त्यामुळे त्यानंतर रात्रीच्या वेळी येल्लापुर गाठणे खूपच कठीण काम होते. पण सर्व सहकाऱ्यांचा दृढ निश्चय आणि धाडस यामुळे आम्ही ते पूर्ण करू शकलो. एक लाईफ टाईम अनुभव आम्ही घेतला.
समुद्राच्या बाजू बाजूने प्रवास करताना दमट वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे खूपच त्रास होत होता. शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. पण उद्दिष्ट पूर्ण करायचेच अशा निश्चयाने आम्ही हा प्रवास आनंद घेत पूर्ण करू शकलो असे मत चैतन्य वंजारे आणि रणजीत सिंग यांनी व्यक्त केले.
कोणतीही मोहीम पूर्ण करण्यासाठी खुप मेहनत करावी लागते, शारीरिक कष्ट करावे लागतात, त्यामुळे शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी योग्य आहार, पुरेशी विश्रांती,घेणे गरजेचे असते, सायकलिंग सुरू करण्यापूर्वी व दिवसाच्या शेवटी योग्य रीलॅक्सिंग व्यायाम करणे आवश्यक असते, आणि तो आम्ही नियमित करत होतो. त्यामुळे या मोहिमेला यशस्वी करण्यात की कोणतीही अडचण आली नाही, असे मत आनंद गुंजाळ व प्रवीण जगदाळे यांनी व्यक्त केले.
मोहीम सुरू झाल्यानंतर पुणे ते कन्याकुमारी येथे पर्यंत इंडो अथे टिक सोसायटी चे अजित पाटील, सातारा येथे मयुर मिसाळ, कराड येथील राहुल चौगुले, कोल्हापूर येथील आनंद लोंढे, राम वाईंगडे, रमेश बसाण, एस के पाटील ,सुनील माटे, रघुनाथ पाटील, अशोक गोक्काकर, जोतिबा पाटील, गणेश पाटील यांनी निपाणी येथे मंजुनाथ पिसोत्रे आणि सहकारी, बेळगाव येथे रोहन हरगुडे, श्री शेळेकर , राजू नाईक यांनी भेटून स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.
या मोहिमेसाठी इंडो अथलेटिक सोसायटी चे अध्यक्ष गजानन खैरे यांचे खुप मोलाचे सहकार्य लाभले. तसेच अजित पाटील, गणेश भुजबळ, प्रदीप टाके, संतोष नखाते मारुती विधाते, बाळासाहेब तांबे, हरी प्रिया नटराजन, रमेश माने, अजय दरेकर, अभय खटावकर अविनाश चौगले यांचे मार्गदर्शन मिळाले.
No comments:
Post a Comment