कुदनूर येथे ट्रॅफिक जाम...! आठवडी बाजार दिवशी व्यापारी, ग्राहक व ग्रामस्थांची कुचंबना - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2023

कुदनूर येथे ट्रॅफिक जाम...! आठवडी बाजार दिवशी व्यापारी, ग्राहक व ग्रामस्थांची कुचंबना

 

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा

      मुख्य रस्ता एकच त्यात उसाची भरून जाणारी ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो,  दुचाकी, चार चाकी वाहने, बस, सायंकाळी शेतातून परतणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैलगाड्या यामुळे काल कुदनूर येथे वाहतूकीची कोंडी झाली. बुधवार कुदनूर आठवडी बाजाराचा दिवस कोंडीमुळे ग्रामस्थ व्यापारी व ग्राहक तसेच वाहनधारक त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडीमुळे संपूर्ण वाहतूक एक तास ठप्प झाली. 

      कुदनूर चा आठवडी बाजार आता खूप मोठ्या प्रमाणात भरत आहे. व्यापारी व ग्राहकांची संख्या वाढली आहे. कालकुंद्री, कागणी, किटवाड, तळगुळी, राजगोळी बू, राजगोळी खु, दुंडगे, दिंडलकोप, खनेट्टी आदी  गावांतून येणाऱ्या ग्राहकांची बाजारात वर्दळ असते.  संध्याकाळच्या वेळी तर कुदनूर ला एखाद्या जत्रेचे स्वरूप आलेले असते. अशा वेळी बाजार पेठेतून एक मार्ग आहे तेथूनच सर्व बस,ऊस ट्रॅक्टर आणि इतर दळणवळण होत असते. वाहतूक कोंडीमुळे विपरीत घटना होऊ शकते. 

      त्यामुळे बाजारच्या दिवशी सायंकाळी उसाची ट्रॅक्टर यांची रहदारी थांबवावी अशी मागणी ग्रामस्थ, व्यापारी संघटना, तरुण मंडळे करत आहेत. तर दुसरीकडे पर्यायी मार्ग लवकर पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतींने प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment