माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या नूतन वास्तूचे शुक्रवारी उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2023

माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या नूतन वास्तूचे शुक्रवारी उद्घाटन

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         'खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री' संचलित चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. संस्था अध्यक्ष ॲड. एस. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दैनिक पुढारी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते विधान परिषद सदस्य अरुण लाड, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम संपन्न होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील स्वागताध्यक्ष आहेत. चंदगड येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
  प्राचार्य डॉ. पाटील यांनी २०१० प्राचार्य पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून गेल्या १३ वर्षात महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्नांमुळे विद्यार्थी संख्या कमालीची वाढली. परिणामी इमारत अपुरी पडू लागली. यातून सन २०१४ मध्ये महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीची बांधकाम सुरू करून ३ मजली भव्य दिव्य इमारत पूर्ण केली. सध्या इमारतीत १४ वर्ग खोल्या, संगणक प्रयोगशाळा व भव्य सभागृहाचा समावेश आहे. या इमारतीस सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च आला असून अंदाजपत्रकापेक्षा हा खर्च कितीतरी कमी आहे. याचे श्रेय संस्था संचालक व इंजिनिअर एम. एम. तुपारे यांना जाते. स्व. र. भा. माडखोलकर यांनी भूमिपूजन भूमिपूजन केलेली त्यांच्या स्वप्नातील इमारत पूर्ण झाली असून लिफ्ट व सौर ऊर्जा प्रकल्प या दोन गोष्टी लवकरच पूर्णत्वास येतील. 
     इमारत उभारणीत संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक, संचालक, कर्मचारी वर्ग यांनी मोठे योगदान दिले आहे. महाविद्यालयात आय. सी. टी. च्या अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येत असून यात एलसीडी प्रक्षेपक, इंटर ऍक्टिव्ह बोर्ड, संगणकीकृत अत्याधुनिक स्मार्ट क्लासरूम बनवण्यात येणार आहेत. महाविद्यालयात आर्ट्स, कॉमर्स व सायन्स पदवी पर्यंत शिक्षणाबरोबरच बीएससी कॉम्प्युटर आणि बीसीए कोर्सेस शिवाय एम. कॉम आणि एम. एस सी केमिस्ट्री हे पदव्युत्तर कोर्सेस सुद्धा सुरू आहेत. अशी माहिती स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. पाटील यांनी दिली. 
    यावेळी प्रा. आर. पी. पाटील, एल. डी. कांबळे, प्रा. एस. के. सावंत संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यास चंदगड तालुक्यातील सर्व नागरिक तसेच हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment