चंदगड / प्रतिनिधी
अयोग्य व्यापार पद्धतीने ग्राहकांची पिळवणूक होऊ नये -ग्राहक नाडला जाऊ नये, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने ग्राहकांना जे हक्क व अधिकार बहाल केले, तसेच त्यांची काही कर्तव्ये निश्चित केली त्याची माहिती असणे गरजेचे आहे. असे झाले तरच बाजारपेठेचा राजा म्हणजे ग्राहक हे म्हणणे रास्त ठरेल." असे प्रतिपादन ॲड. विजय कडूकर यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड तहसील कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. आर. पाटील होते.
ॲड. कडुकर पुढे म्हणाले की "आजचे युग स्पर्धेचे आहे. राहण्यासाठी व नफे खोरीच्या हेतूने उत्पादक व विक्रेत्या कडून ही फसवणूक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने होत असते. आपल्यावरील अन्यायाबाबत दाद कोठे मागावी किंवा ग्राहक म्हणून आपल्याला कोणते अधिकार आहेत, ग्राहक न्यायालयाची कार्यपद्धती कशी असते, दावा कसा दाखल करावा याची माहिती असेल तर या अपप्रकारांना आपोआपच आळा बसेल. यावेळी ॲड. कडूकर यांनी अनेक दाखल्यांचे संदर्भ देत उपस्थितांचे प्रबोधन केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य पी. आर. पाटील यांनी व्यापक समाज प्रबोधन आणि समाजाचा वैचारिक स्तर प्रगल्भ झाला तरच परिस्थितीत फरक पडू शकतो, ग्राहकासंबंधीचे कायदे आणि न्यायव्यवस्था यांची माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. वन व सार्वजनिक आरोग्य विभाग यामधील अधिकारी व कर्मचारी तसेच एस. एस. सावंत, व्ही. के. गावडे, एस. एन. पाटील, एम. एम. माने, बी. एम. पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. टी. ए. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन ए. डी. कांबळे यांनी केले तर एस. डी. गोरल यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment