कर्यात भागात भात मळण्या रखडल्या, कडपाल पेरणी लांबणीवर,..! अवकाळी पावसाचा परिणाम - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2023

कर्यात भागात भात मळण्या रखडल्या, कडपाल पेरणी लांबणीवर,..! अवकाळी पावसाचा परिणाम

कालकुंद्री शिवारात पारंपारिक बैल औताच्या सहाय्याने मसुरीची पेरणी करताना शेतकरी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
      चंदगड तालुक्यातील कर्यात भागात रब्बी हंगामात मसूर, वाटाणा, हरभरा, मोहरी आदी पिके घेण्यास यंदा जमिनीतील ओलावा व हवामान उत्तम होते. गेल्या १०-१५ दिवसांत कडपाल पेरणी जोरात सुरू होती. तथापि ४-५ दिवसांपासून वारंवार सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जोमात असलेला भाताच्या सुगीचा हंगाम तसेच कडधान्य पेरणीला 'ब्रेक' बसला आहे.
     शेकडो वर्षांपासून कर्यात भागातील कालकुंद्री, कुदनूर, कोवाड, किणी, कागणी, नागरदळे, निट्टूर, दुंडगे, म्हाळेवाडी, घुल्लेवाडी आदी गावांत पिकणाऱ्या मसूर, वाटाणा आदी कडधान्य पिकांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे जगभरात मागणी आहे. दूरच्या पाहुण्यांनाही आवर्जून मसूर, वाटाणा अशी कडधान्येच भेट म्हणून दिली जात होती. तथापि गेल्या काही वर्षातील अनियमित हवामान तसेच ऊस पिकाखालील वाढत्या क्षेत्रामुळे कडपालांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. परिणामी येथे उत्पादित केलेल्या मसुरीचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र यंदा भात पीक कापणी नंतर जमिनीतील ओलावा पेरणी योग्य मिळाला होता, तसेच हवामानही या पिकांना पोषक होते. 
    दहा-पंधरा दिवसापूर्वी पेरणी झालेली मसूर, वाटाणा, मोहरी ची उगवण चांगली झाल्यामुळे पिके जोमात होती. पण अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने उगवण झालेली पिके खराब होण्याच्या धोका निर्माण झाला आहे. पावसाने जमीनीत पाणी साठल्याने पेरणी हंगाम  लांबणीवर पडून मिळणाऱ्या उत्पादनात घट होणार आहे. दुसरीकडे ऊस तोडणी, भात कापणी मळणी आदी कामे रखडल्याने  परिसरातील बळीराजा अवकाळीने आता रजा घ्यावी अशी अपेक्षा बाळगून आहे.

No comments:

Post a Comment