२१ वासरे व रेडके टेम्पोत कोंबून नेणाऱ्या चालकावर गुन्हा....! चंदगड पोलिसांची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2023

२१ वासरे व रेडके टेम्पोत कोंबून नेणाऱ्या चालकावर गुन्हा....! चंदगड पोलिसांची कारवाईकालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
    प्राणी अधिनियम कायद्याचा भंग करून चंदगड तालुक्यातून कर्नाटक राज्यात छोटी वासरे व रेडकांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकावर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
   याबाबत कोवाड व चंदगड पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. २५ डिसेंबर सायंकाळी ७ च्या सुमारास  नागेश खिराप्पा वाघमोडे (रा. माणगाव, ता चंदगड) आपल्या ताब्यातील छोटा हत्ती टेम्पो या वाहनातून बेकायदेशीररित्या जनावरांची वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच कोवाड पोलीस दूरक्षेत्राचे पोहेकॉ जमीर मकानदार व  सहकाऱ्यांनी कामेवाडी ते दड्डी कर्नाटककडे जाणारे संशयित वाहन नरगटे फाट्यावर अडवून कारवाई केली. 
     सदर छोटा हत्ती वाहनात म्हशीची १९ रडके व गायीची २ वासरे अशी २१ जनावरे त्यांच्या चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता दाटीवाटीने, निर्दयपणे कोंबून नेली जात होती. वाघमोडे यांने महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (सुधारणा अधिनियम २०१५) प्राण्यांना निर्दयपणे वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम ११/१ ड तसेच मोटार वाहन कायदा कलम ६६/१९२ चा भंग केल्याचे दिसून आले.
   या कारवाईत ९० हजार रुपये किमतीचा टेम्पो व ४२ हजार रुपये किमतीची रेडके व वासरे असा २ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सब इन्स्पेक्टर रावसाहेब कसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमीर मकानदार, विनायक सुतार अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment