किटवाडच्या प्रतीक पाटीलची ओडिसा येथील राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2023

किटवाडच्या प्रतीक पाटीलची ओडिसा येथील राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

प्रतीक पाटील
कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
    भुवनेश्वर (ओडीसा) येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी किटवाड, ता चंदगड येथील प्रतिक पांडुरंग पाटील याची पश्चिम विभागीय विद्यापीठ संघातून निवड झाली आहे.  त्याने मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम विभागीय स्पर्धेत २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, ४×४०० व ४×१०० रिले प्रकारात यश मिळवले होते. 
    चंदगड तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम खेड्यातून त्याने क्रीडा क्षेत्रात केलेली प्रगती भागातील विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरणारी आहे. तो शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघातून ओंकार महाविद्यालय गडहिंग्लजचा खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करत आहे. त्याला कॉलेजचे प्राचार्य डॉ अनिल पाटील, क्रीडा शिक्षक व संस्था पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.
     अत्यंत गरीब कुटुंबातील प्रतिकने  मिळवलेल्या  खडतर, कष्टसाध्य उज्वल यशाबद्दल सर्वत्र  कौतुक होत असून त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत व किटवाड येथील तरुण मंडळांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment