ज्ञान हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती, ती कोणीही हिराऊन घेवू शकत नाही -प्रतापसिंह जाधव, माडखोलकर महाविद्यालयाचा विस्तारित वास्तु उद्घाटन सोहळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2023

ज्ञान हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती, ती कोणीही हिराऊन घेवू शकत नाही -प्रतापसिंह जाधव, माडखोलकर महाविद्यालयाचा विस्तारित वास्तु उद्घाटन सोहळा संपन्न

माडखोलकर महाविद्यालयाचा विस्तारित वास्तु उद्घाटन सोहळ्या प्रसंगी बोलताना दैनिक पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, शेजारी मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         "मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असतो. माणसाचे ज्ञान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. विद्यार्थी वृत्ती व कुतुहल जागृत ठेवून माणसाने सतत ज्ञानग्रहण करावे. एकेकाळी भारतात तक्षशिला नालंदा, विक्रमशिला अशी विद्यापीठे होती. गुरुकुल पद्धतीने अध्ययन अध्यापन घडत होते. भारतीय संस्कृती विश्ववंद्य होती. परंतु सध्या मात्र देश स्वतंत्र होऊनही अद्याप निरक्षरता, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा यांचे थैमान आहे. जगातील शंभर विद्यापीठात भारताचे एकही विद्यापीठ नाही. साक्षरता जरी वाढली तरी लोकसंख्या ही प्रचंड वाढली.

कार्यक्रमात बोलताना माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील.

        आजच्या काळात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विस्फोट होत आहे. अशा परिस्थितीत फुले दांपत्य, आंबेडकर, शाहू, पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेडोपाड्यात ज्ञानाची गंगा पोहोचवण्यासाठी जे भगीरथ प्रयत्न केले. त्याचे स्मरण करून उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत. ब्रिटनचा पंतप्रधान ऋषी सुनक वअमेरिकन उपाध्यक्ष कमला हॅरिस हे मूळचे भारतीय वंशाचेच आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यातून भारतीय व्यक्ती मोठ्या हुद्यावर काम करत आहेत. गुगलचा सीईओ सुंदर पिचाई दिवसाला पाच कोटी पगार घेतो. येत्या काही वर्षात भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश असेल. पुस्तकी ज्ञानाला व्यावहारिक शहाणपणाची जोड देऊन विद्यार्थ्यांनी आपले जीवन यशस्वी बनवले पाहिजे.``

महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. आर. पाटील यांचा मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

      राजकारण न करताही समाजकारण करता येते. याचा आदर्श पुढारीने सर्वांसमोर ठेवल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, ``किल्लारीचा भूकंप असो की सियाचीन सारख्या भागात जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून उभे केलेले अद्ययावत हॉस्पिटल असो पूर, रस्ते, जनतेचे आरोग्य. अशा अनेक समस्या वर पुढारीने प्रभावी काम करून जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे ."असे प्रतिपादन दैनिक पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांनी केले. ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या विस्तारित वास्तूच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. एस. आर. पाटील हे होते. ते पुढे म्हणाले की, ``केवळ टीके साठी टीका करू नये तर विधायक कारणासाठी करावी. वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना अभिमत विद्यापीठांना परवानगी देऊन नवी शैक्षणिक क्रांती केली. शिक्षणावरील सरकारी खर्च वाढायला हवा.स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी महाविद्यालयाने अल्पावधीत केलेल्या नेत्रदीपक प्रगतीचा आढावा घेतला. तसेच महाविद्यालयाने गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न केला.  

      क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले योगदान, महाविद्यालयाची उपक्रमशीलता, गुणवत्ता वृद्धी अभ्यासक्रम यांचाही आढावा घेऊन महाविद्यालय काळाशी  सुसंगत पद्धतीने मार्गक्रमण करीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. अध्यक्ष ॲड. एस. आर. पाटील यांनी भविष्यात महाविद्यालयाचा अधिकाधिक उत्कर्ष होण्यासाठी संस्थेच्या पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे सांगितले. शिक्षणाची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी शिक्षण सर्व दूर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी आर. पी. पाटील, माजी रो. ह. यो. मंत्री भरमू अण्णापाटील, माजी प्राचार्य एस. पी. बांदिवडेकर, आनंद मेणसे यांनीही मनोगते व्यक्त केली. 

         कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व स्वागतगीताने झाली. सुरुवातीला र. भा. माडखोलकर यांच्या स्मृतीस्थळास मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली. कोतोली येथील ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमास आर. पी. बांदिवडेकर, दयानंद काणेकर, नगराध्यक्षा प्राची काणेकर, बाबू हळदणकर, सचिन बल्लाळ, सुरेश सातवणेकर, शांताराम पाटील, आनंद सुतार, नितीन पाटील, प्रभाकर पाटील, उमर पाटील, गोपाळ बोकडे, एल. डी. कांबळे, ज. गा. पाटील, एन. एस. पाटील, एस. व्ही. गुरबे, एस. बी. भांबर कान्होबा माळवी, अशोक पाटील, पुष्पाताई नेसरीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्या वाचस्पती (पी. एच. डी.) पदवी मिळाल्याबद्दल डॉ. टी. एम. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

         तसेच नूतन वास्तूचे  काम करणारे अरुण लोहार, शिवाजी बोकमूरकर, रमेश सुतार, दत्तात्रय वाले, तेजपाल यादव, यल्लाप्पा कांबळे, नागेश पेंटर यांचाही सत्कार करण्यात आला. प्राचार्य पी. आर. पाटील व एम. एम. तुपारे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. स्वागताध्यक्ष प्राचार्य पी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एन. एस. मासाळ यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment