चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करावे. स्वतःच्या आवडीनिवडी ,कल जाणून घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रभुत्व संपादन करावे. आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्याचे व्यावहारिक उपयोजन केल्यास निश्चितच फार मोठे संधीचे क्षेत्र खुले आहे. योग्य दृष्टिकोन असेल आणि परिश्रम घेण्याची तयारी असेल तर निश्चितच जीवनात स्थैर्य मिळू शकते. अध्यापन, संपादन, समाज माध्यमे, वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, अनुवाद क्षेत्र, मुद्रित शोधन अशा अनेक क्षेत्रातील संधी उपलब्ध असून त्यासाठी जिज्ञासा, चौफेर निरीक्षण, शोधक वृत्तीची गरज आहे." असे प्रतिपादन डॉ. दीपक माने यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील हिंदी विभागाने यशवंतराव चव्हाण अग्रणी महाविद्यालय, हलकर्णी व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या "साहित्य, सिनेमा और मिडिया की युवा विकास में भूमिका" या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी विद्यार्थ्यांनी डोळ्यासपणे अभ्यास करावा व शिक्षणाचा खरा उद्देश समजून घ्यावा. परिश्रमाने जीवनाचे सोने होते. हे जाणून स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार बनावे असे आवाहन केले. दुसरे साधन व्यक्ती प्रा. डॉ. एस. एन. पाटील यांनी 'बदलत्या काळात रोजगारांचे स्वरूप ही बदलले आहे हे लक्षात घ्यावे. कालानुरूप तंत्रज्ञान व कौशल्ये आत्मसात करावीत तसेच आत्मविश्वासाने आव्हाने पेलावीत. जबाबदारी पत्करली तर माणूस सक्षम बनतो.' असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा. आनंद कलजी, वाय. पी. पाटील, अशोक बाचुळकर, दयानंद पाटील, सागर सावंत, ए. के. कांबळे, मीनल माळी, प्रियांका कोकरे, व्ही. बी. पवार यांच्यासह गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीन तालुक्यातील विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. एस. एस. सावंत यांनी केले. सूत्रसंचालन ए. डी. कांबळे यांनी केले तर डॉ. आर. ए. कमलाकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला जलार्पण करण्यात आले.
No comments:
Post a Comment