हेरे सरजांम जमीनीबाबात प्रशासनाची आडवणूक, शेतकरी संतप्त, तहसील कार्यालयावर मोर्चा, ४ तारखेचे आत्मदहन आंदोलन स्थगित - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2024

हेरे सरजांम जमीनीबाबात प्रशासनाची आडवणूक, शेतकरी संतप्त, तहसील कार्यालयावर मोर्चा, ४ तारखेचे आत्मदहन आंदोलन स्थगित

  


चंदगड / प्रतिनिधी 

         हेरे सरंजाम जमीनीबाबात शासन स्तरावर अध्यादेश निघून सुध्दा केवळ प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे   वर्ग १ होण्यास अडथळा निर्माण होत असून, प्रशासनाकडून ५५ गावातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आज शेतकऱ्यांनी चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

    मोर्चाला दुपारी १२ वाजता चंदगड येथील रवळनाथ मंदिरातून सुरवात झाली  गुरूवार पेठेतून कोर्टमार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोर्चात‘जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चेकरी शेतकऱ्यांनी सरंजाम तहसीलदार यांच्या दालनासमोर ठाण मांडली व ७/१२ पत्रकी हेरेसरंजाम च्या वर्ग २ जमीनी जो पर्यंत वर्ग १ होत नाहीत, तोपर्यंत हलणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. यावेळी नायब तहसीलदार हेमंत कामत यांनी हेरे सरंजाम आदेशाचे वाचन केले. 

        मात्र शासनाने तालुक्यातील हेरे सरंजाम जमिनीच्या कागदपत्रांची पूर्तता करावी असे म्हटले. तहसीलदार राजेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या  हेरे सरंजाम जमीनीबाबत आदेशाचे वाचन केले व आदेशाची प्रत रणजित गावडे, धोंडीबा (रवी) नाईक, अनिल रेंगडे यांच्याकडे दिली. तसेच ४ जानेवारी २०२४ रोजी सामाजिक कार्यकर्ते रवि नाईक, माजी सैनिक रणजित गावडे, अनिल रेंगडे यांनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा केला होता. परंतु जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी हेरे सरंजामचा आदेश काढल्याने आत्मदहन रद्द करण्यात आले असे म्हटले आहे. 

       यावेळी धोंडीबा नाईक यांनी आज झालेल्या अभूतपूर्व मोर्च्यामध्ये सहभागी झालेल्या तमाम शेतकरी बांधवांचे अगदी मना पासून आभार मानले. तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्याला कुठे तडा न जाता त्याच विश्वासाने आम्ही अगदी प्रामाणिकपणे हा लढा सुरू ठेऊ. जो पर्यंत या पत्रकाची अमल बजावणी आणि आपल्या सर्वांचा ७/१२ वर्ग १ होत नाही. तो पर्यंत या लढ्याची ताकत कमी होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव हळदणकर, महादेव प्रसादे, भिमराव चिमणे, एम. जी. पाटील, अशोक देसाई, सरपंच प्रकाश वाईगडे, मारूती गावडे, संजय पाटील, राजेंद्र कापसे यासह ५५ गावातील शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment