कुदनुरच्या न पा पु पाईप लाईन खुदाईमुळे किटवाड रस्त्याची दूर्दशा |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७४ वर्षे कुदनूर ते किटवाड या साडेतीन किमी रस्त्यासाठी अनेक आंदोलने किटवाड ग्रामस्थांनी केली. यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हा रस्ता आमदार व इतर फंडातून पहिल्यांदा डांबरीकरण करून बारमाही वाहतूक सुरू झाली. शेकडो वर्षे चिखलातून प्रवास केलेल्या ग्रामस्थांचा प्रवास सुखकर झाला होता. तथापि मुळातच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या या रस्त्यावर कुदनूर ग्रामपंचायत मार्फत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईनची खोदल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
अलीकडे कुदनूर गावाला पाणीटंचाई भासत असल्यामुळे नवीन योजनेअंतर्गत किटवाड लघु पाटबंधारे धरण क्र. २ च्या खाली ओढ्यात जॅकवेल मारून त्यातील पाणी पाईपलाईन द्वारे गावात आणण्याचे काम सुरू आहे. यासाठी मारण्यात आलेली चर कुदनूर किटवाड रस्त्यालगत मारली आहे. या रस्त्यात निरंतर सुरू असलेले दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांचे अतिक्रमण यामुळे २५-३० फुट रुंदीचा रस्ता जेमतेम दहा-बारा फुटावर आला आहे. सध्या मारण्यात आलेली चर व त्यावरील माती रस्त्यातच आल्याने वाहतूक वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून त्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे वाहनधारकांची चांगलेच हाल सुरू आहेत. या खुदाई मुळे येत्या पावसाळ्यात रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून कर्नाटकातील हंदीगानवर कंग्राळी बेळगाव हे अंतर कमी असल्याने नेसरी, कोवाड, कालकुंद्री, कुदनूर परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारक बेळगाव ला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून उपयोग करत असल्याने इकडे वाहतूक वाढली आहे. तथापि रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे पुढे काय ? हा प्रश्न किटवाड सह परिसरातील ग्रामस्थांना भेडसावत आहे. या रस्त्याची रुंदी वाढवण्यासह मजबुती करणासाठी तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment