सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन देताना हरिश्चंद्र देसाई व पुरुषोत्तम देसाई |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोट्यवधी रुपये खर्चूनही अर्धवट अवस्थेतील किल्ले पारगड ते मोर्ले रस्ता प्रश्नी पंचक्रोशीतील ग्रामस्थ दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. दि.२० फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होणारे उपोषण याच प्रश्नासाठी गेल्या २५-३० वर्षातील विक्रमी ३३ वे आंदोलन आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाच्या समन्वयाअभावी हे ८ किमी लांबीच्या रस्त्याचे काम गेली ५ वर्षे रखडले असून यासाठी झालेला कोट्यावधी रुपयांचा खर्च या अनागोंदी कारभारामुळे वाया जाणार आहे. राज्यातील जनतेच्या कष्टाच्या पैशातून खर्ची पडलेला हा पैसा असा वाया जात असेल तर दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांकडून तो वसूल करावा. अशी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान या प्रश्नी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी या कामी लक्ष घालून उर्वरित निधी मंजूर करून काम पूर्ण करावे अशी आग्रही मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. हे निवेदन किल्ले पारगड आजोळ असलेले डेगवे गावचे सुपुत्र हरिश्चंद्र देसाई आणि पुरुषोत्तम देसाई यांनी मंत्री महोदयांना मुंबई मुक्कामी देऊन या कामी लक्ष घालण्याची विनंती केली.
या रस्त्यासाठी अनेक वर्षे आंदोलने सुरू आहेत. २० फेब्रुवारी २०२४ रोजी होणारे आंदोलन निर्णायक ठरणार आहे. यावेळी अधिकाऱ्यांच्या लेखी, तोंडी आश्वासनावर विश्वास न ठेवता निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घ्यायचे नाही या निर्णयावर आंदोलक ठाम आहेत. या आंदोलनात चंदगड तालुक्यातील पारगड, मिरवेल, नमखोल, हेरे, ईसापूर, वाघोत्रे, पाटणे, मोटणवाडी, कलानंदीगड, पार्ले, हंबेरे आदी तर दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले, घोटगेवाडी, केर, कोणाळकट्टा, दोडामार्ग, भेडशी, तेरवण, पेंढरेवाडी, आवाडे, साटेली, आंबेली आदी अनेक गावातील नागरिक सहभागी होणार आहेत. शिवरायांनी अरबी समुद्रातील आरमार दलावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेल्या सिंधुदुर्ग व किल्ले पारगड दरम्यानच्या या रस्त्याला शिवकाळापासून ब्रिटिश काळातही दळणवळण दृष्ट्या महत्त्व होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांची जीप सारखी वाहने या रस्त्यावरून पारगडला येत. मोर्ले हे पारगडचे प्रवेशद्वार समजले जायचे.
सद्यःस्थितीत रखडलेला हा रस्ता वन विभाग, बांधकाम विभाग तसेच कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाने समन्वयाने पूर्ण करावा, यासाठी दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे. देशभरातील सगळ्या रस्त्यांच्या कामांना निधी मिळतो मग याच रस्त्याला का मिळत नाही? असा संतप्त सवालही आंदोलकांनी केला आहे. हा रस्ता धोकादायक तिलारी घाटाला पर्याय असून येथून कोल्हापूर- पणजी, बेळगाव- पणजी अंतर सुलभ व २५ किलोमीटरने कमी होणार आहे. अलीकडच्या काळात तिलारी दोडामार्ग घाटात वाहने अपघातग्रस्त होऊन रस्ता अनेक वेळा वाहतुकीस बंद होत आहे. अशावेळी चंदगड बेळगाव परिसरातील सर्व वाहने गोवा व सिंधुदुर्गला जाण्यासाठी व तिकडून येण्यासाठी याच अपूर्ण व धोकादायक रस्त्याचा वापर करत आहेत. हा रस्ता पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणारा हा सर्वात सुरक्षित मार्ग ठरणार आहे.
उपोषणा बाबतचे निवेदन संबंधित सर्व विभागांना देण्यात आल्याची माहिती पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी दिली असून त्यांच्यासह सुजाता मणेरीकर, ज्ञानेश्वर चिरमुरे, प्रदीप नाईक, प्रकाश नाईक, हरीश गवस, संतोष पवार, रमावती पारगडकर, समीर खुटवळकर आदी दशक कृषीतील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
No comments:
Post a Comment