खंडित वीज पुरवठ्याचा 'वर्क फ्रॉम होम' ला फटका, वीज कंपनीने पूर्वसूचना देण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2024

खंडित वीज पुरवठ्याचा 'वर्क फ्रॉम होम' ला फटका, वीज कंपनीने पूर्वसूचना देण्याची मागणी

 

संग्रहित छायाचित्र

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा

        आढवड्याची सुरुवात तसेच शनिवार, रविवार सुट्टीनंतर कामाचा पहिला दिवस म्हणून सोमवारला महत्व आहे. दोन दिवसाच्या सुट्टीमुळे खोळंबलेली कामे उरकून घेण्याची घाई प्रत्येकाला असते. तथापि वीज वितरण कंपनीचा 'मेन्टेनन्स' दिवस सोमवारीच असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका 'वर्क फ्रॉम होम' काम करणाऱ्यांना बसत आहे. वीज कंपनीने वीज किती तास खंडित होणार आहे याची पूर्व सूचना आदल्या दिवशी द्यावी अशी मागणी होत आहे.

          कोरोनामुळे मानवी जीवनात अनेक बरे वाईट बदल झाले आहेत. याचा परिणाम नोकरी, उद्योग, व्यवसाय व सामाजिक व्यवहारावर दिसत आहेत. कामानिमित्त दूर असलेले अनेक जण आता गावातील घरी बसून ऑफिसचे काम करत आहेत. यातून काही कंपन्यांना फायदा तर काहींना नुकसान पण होताना दिसते. सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पूर्वीपेक्षा लोड शेडिंग कमी असले तरी अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्या उद्भवतात. तर शनिवार, रविवार सुट्टीनंतर सलग तिसरा दिवस नियमित दुरुस्तीसाठी हक्काचा दिवस म्हणून सोमवारी बहुतांशी वेळा पुरवठा खंडित केला जातो.  ऑफिसचे काम किमान आठ तास करावे लागते तथापि ज्या लॅपटॉप वर काम करायचे आहे त्याची  बॅटरी क्षमता तितकी नसल्याने कामात खंड पडतो. परिणामी 'काम नाही- पगार नाही' या न्यायाने पगारापासून वंचित राहावे लागत आहे. बॉस व मालकाची बोलणी खावी लागतात ती मानहानी वेगळीच, अशी अवस्था आहे. 

         वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीज केव्हा येणार हे विचारण्यासाठी विज कंपनी कार्यालयात फोन केला असता तर बऱ्याच वेळा उचलत नाहीत, उचलला तरी समाधानकारक उत्तर दिले जात नाही असा अनुभव आहे. या सर्व समस्यांवर वीज कंपनीने तोडगा काढून दुरुस्ती दिवस शनिवार किंवा रविवार करावा तसेच नियोजनाप्रमाणे दुसऱ्या दिवशी वीज पुरवठा खंडित करायचा असेल तर एक दिवस आधी स्थानिक वृत्तपत्र, युट्युब चॅनेल किंवा सोशल मीडिया मधून याबाबतच्या अधिकृत पूर्व सूचना द्याव्यात अशी मागणी त्रस्त नागरिक करत आहेत.

No comments:

Post a Comment