कोवाड- तेऊरवाडी मार्गावर गव्याच्या धडकेतील जखमीची दुखापत गंभीर, उपचार सुरुच - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2024

कोवाड- तेऊरवाडी मार्गावर गव्याच्या धडकेतील जखमीची दुखापत गंभीर, उपचार सुरुच

  

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        मागील आठवड्यात कोवाड ते तेऊरवाडी मार्गावर गव्याच्या धडकेत तिघेजण जखमी झाले होते. यातील दोन जखमी आजरा येथील नवीन बशीर मुल्ला वय २८ व अमीरगालिब मुनीर मकानदार वय २२ या दोन्ही जखमींना तात्काळ गडहिंग्लज येथील रुग्णांलयात हलवण्यात आले होते. तथापि गव्याच्या हल्ल्यातील तिसरा जखमी निट्टूर (ता. चंदगड) येथील नामदेव ईश्वर पाटील (वय ४५) यांच्या दुचाकीला धडक देऊन गव्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. ते रस्त्याकडेला फेकले गेले व आरडाओरडा करत पळून आपला जीव वाचवला. यावेळी त्यांना झालेली दुखापत गंभीर वाटली नाही, तथापि नंतर त्यांना मान दुखीचा त्रास होऊ लागल्याने गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून ही दुखापत गंभीर असल्याचे दिसून आले आहे. गेल्या पाच सहा दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेले नामदेव पाटील यांच्यावर गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

          रोज सायंकाळी सातच्या सुमारास गव्यांचा कळप दुंडगे कडील डोंगरातून पाणी पिण्यासाठी जक्कनहट्टी च्या बाजूला असलेल्या पाझर तलावात पाणी पिण्यासाठी येतात. अंधारातून हे गवे लगेच न दिसल्यामुळे दुचाकीस्वार थेट कळपानजीक आल्यानंतर गव्यांच्या हल्ल्याला बळी पडतात. कोवाड ते आजरा मार्गावर गवे पाणी पिण्यासाठी येण्याचे असे चार स्पॉट आहेत. तेथून सायंकाळच्या वेळी दुचाकी व अन्य वाहनधारकांनी सावधगिरीने जाणे गरजेचे आहे. अशा ठिकाणी वन विभागाच्या वतीने सावधगिरीचे फलक लावण्याची गरज आहे. गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जखमींना वन विभागाकडून आर्थिक मदत व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment