चंदगड तालुक्यात येणाऱ्या हत्ती व गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा....!, जनता दरबारात ठाकरे शिवसेनेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2024

चंदगड तालुक्यात येणाऱ्या हत्ती व गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा....!, जनता दरबारात ठाकरे शिवसेनेची मागणी

 

चंदगड उपविभागातील हत्तींच्या उपद्रवाबाबत कोल्हापूर येथील जनता दरबारात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी चर्चा करताना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर व अनिल दळवी

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तीन तालुक्यात हत्तींचा व गव्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या हत्तींच्या कळपामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतवडीत जाणे देखील शेतकऱ्यांना मुश्किल झाले आहे. या हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी शासन स्तरावरून प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे तसेच तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर, अनिलभाऊ दळवी यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. दानवे हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत जनता दरबार पार पडला. यावेळी प्रा. शिंत्रे व चंदगड तालुक्यातील दोन्ही तालुकाप्रमुख यांनी समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. 

           गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तीन तालुक्यात गेल्या २० वर्षापासून हत्तींचे व गव्यांचे कळप येत आहेत. त्यामुळे शेतीतील पिकांचे प्रचंड नुकसान दरवर्षी होत आहे. या विभागात मुबलक पाणी आणि हत्तीसाठी आवश्यक असलेले हे खाद्य उपलब्ध असल्यामुळे दरवर्षी ठराविक काळात हत्तींचे कळप येतात. हत्ती व गव्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून हत्ती नागरी वस्तीत येऊ लागल्याने प्रश्न गंभीर बनला आहे. वनविभागाने हत्तींना रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या, त्यावर कोट्यवधी रुपये खर्ची पडले परंतु हत्तींचा त्रास थांबलेला नाही. डॉ. पतंगराव कदम वनमंत्री असताना 'गो बॅक एलिफंट' ही योजना राबविली याशिवाय ज्या विभागातून हत्तींचे कळप येतात त्या सीमारेषेवर चर खणण्यात आली. परंतु या साऱ्या उपाययोजना अयशस्वी ठरल्या आहेत.

           हत्तीचे कळप कर्नाटक पासून चंदगड, आजरा, आबोली मार्गे कोकण आणि गोव्यात जात असतात. याच मार्गावर त्यांचा वावर आहे. मध्यंतरी हत्तींना रोखण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेवून नियोजन केले होते. परंतू त्याचाही काही उपयोग झालेला नाही. चार वर्षापूर्वी कोकणातील मंत्री उदय सामत यांनी हत्तींना बंदोबस्तासाठी आंबोली नजीक 'हत्तीग्राम' म्हणजेच हत्तीसाठी संरक्षक क्षेत्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. जागांची पाहणी सुरू होती. परंतु पुढे या प्रश्नाचे काय झाले? हे समजलेले नाही. हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. नुकसानीपोटी शासनाकडून मिळणारी मदत अत्यंत तोकडी आहे.

          अलिकडे हत्तींचे कळप गावागावात येत असल्याने एक प्रकारचे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतीची कामे करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. या हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. याकडे जिल्हाप्रमुख प्रा. शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली लक्ष वेधले आहे.

No comments:

Post a Comment