शेतकऱ्यांसाठी दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करा...! मनसेचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2024

शेतकऱ्यांसाठी दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करा...! मनसेचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

 

निवेदन देताना मनसे जिल्हाध्यक्ष नागेश शिवाजी चौगुले व सहकारी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

       यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातचा गेला आहे. या परिस्थितीची दखल घेऊन शासनाने महाराष्ट्रातील सुमारे १५००  महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. खरे तर संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना शासनाने दुष्काळी निकषात उर्वरित महसूल मंडळे बसत नसल्याचे कारण देत दुष्काळ जाहीर केला नाही. जिथे  अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. तिथेही  दोन महिने उलटले तरी एकाही शेतकऱ्याला अनुदान किंवा दुष्काळी उपाय योजनांची अंमलबजावणी झालेली नाही. 

       पीक कापणीत उत्पन्न जास्त दाखवल्याने  पीक विमा मिळायला तयार नाही. विद्यार्थ्यांची परीक्षा फी, विज बिल माफी नाही. उलट दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडील कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे. शेतीमालाला किमान हमीभाव मिळणे अपेक्षित असताना सोयाबीन हमीभावापेक्षा ४०० ते ५०० रुपये कमी दराने खरेदी केले जात आहे. याला सरकारचे आयात निर्यात धोरण कारणीभूत आहे. कापूस, कांदा, टोमॅटो पिकांना भाव मिळत नाही परंतु सरकार पुढील निवडणुकांच्या धोरणात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या कोणत्याही गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांना त्यांची गुरेढोरे चारा पाण्याविना सांभाळणे अवघड होत असल्याने कवडीमोल दराने खाटकांना विकावी लागत आहेत. जाहीर केलेले प्रोत्साहन अनुदान अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. ज्या गावांना पाणी टंचाई आहे तिथे टँकरची व्यवस्था तात्काळ करावी.  

        शेतकऱ्यांचा ऊस जागेवरच वाळून जात आहे. अशा सर्व समस्यांमुळे महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून शासनाने संपूर्ण राज्य दुष्काळग्रस्त जाहीर करावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. सर्व उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश शिवाजी चौगुले, मनविसे जिल्हा अध्यक्ष प्रभात साबळे, शहर अध्यक्ष केप्पांना कोरी. शहर उपाध्यक्ष संदिप कुरबेट्टी, सचिन प्रसादे, श्रवण पोवार, प्रवीण बरकाळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment