कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
शिवजयंती निमित्त मराठा सेवा संघ बेळगाव जिल्हा आयोजित विधुर, विधवा, घटस्फोटीत महिला व पुरुष यांचा परिचय मेळावा तसेच मराठा समाजापुढील सामाजिक आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दि १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता मराठा सभागृह गणेश कॉलनी संभाजीनगर, वडगाव- बेळगाव येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मराठा सेवा संघ बेळगाव जिल्हा अध्यक्ष किरण धामणेकर यांनी केले आहे.
सध्या मराठा समाजाला अनेक सामाजिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यापैकी सर्वात मोठी समस्या म्हणजे विधुर, विधवा आणि घटस्फोटीत महिला व पुरुषांचे विवाह. त्यांच्या सामाजिक अडचणी लक्षात घेऊन पुरुष महिलांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विविध कारणास्तव समाजातील काही मुला मुलींच्या विवाहाला उशीर झाला असेल आणि त्यांना विधवा, विधुर, घटस्फोटीत यांच्या सोबतचा विवाह मान्य असेल त्यांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा. अशा बंधू-भगिनींनी मोबाईल क्रमांक 8904287570 वर सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत संपर्क साधावा. तसेच याच व्हाट्सअप नंबर वर आपले परिचय पत्र पाठवून द्यावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ११.३० विधुर, विधवा, घटस्फोटीत महिला व पुरुषांचा परिचय मेळावा. दुपारी ११.३० ते १२ जिजाऊ वंदना, शिवगर्जना व स्वागत. दुपारी १२ ते १ शिवश्री रवींद्र खैरे (व्यावसायिक मार्गदर्शक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर) यांचे मराठा समाजापुढील सामाजिक आव्हाने विषयावर व्याख्यान. दुपारी १ ते २ तेज अकॅडमी निपाणी चे संचालक शिवश्री संतोष प्रकाश पाटील यांचे 'शिवअंगार' कवितेतून शिवरायांचे दर्शन. दुपारी २ ते ३ शिवभोजन असे कार्यक्रमाचे स्वरूप असून यावेळी उद्योजक जी. आर. शिरोळकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावचे अध्यक्ष अंकुश केसरकर, उद्योजक तथा धामणे ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा रेमाणीचे, उद्योजक व माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी मराठा समाज बांधवांनी यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment