किटवाड येथे भर दुपारी घरांना आग; लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2024

किटवाड येथे भर दुपारी घरांना आग; लाखोंचे नुकसान

किटवाड येथे घरांना लागलेली आग विझवताना ग्रामस्थ.

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
      किटवाड (ता. चंदगड) येथे भर दुपारी पाच घरांना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज दि. ९ रोजी दुपारी १ ते २ च्या सुमारास घडली.  आगीत सट्टूपा सुबराव पाटील यांचे राहते घर पूर्ण भस्मसात झाले असून बाजूच्या मष्णू पाटील व मारुती देवाप्पा पाटील, सिद्राम यल्लाप्पा पाटील व बुधाजी यल्लाप्पा पाटील यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नसले तरी आग शार्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

   प्राथमिक शिक्षक असलेले सट्टूपा सुबराव पाटील यांची पत्नी काही वेळापूर्वीच या घरातील माळ्यावर गोवऱ्या ठेवून आपल्या नवीन घराकडे गेली होती. यावेळी शाळेतून नुकतेच नवीन घरी परतलेल्या सट्टूपा यांना तिथूनच आपल्या घरातून धुराचे लोळ उठताना दिसले. यावेळी गल्लीतील सिद्धेश मोदगेकर यांने आग पाहून आरडाओरड करण्याबरोबरच सोशल मीडियावर  आवाहन केले. धुराचे लोळ पाहून गावाबाहेर शिवारात असलेले ग्रामस्थ आग विझवण्यासाठी धावले. 

    यावेळी कोणीतरी गावातील विद्युत पुरवठा खंडित केला. तर भरमा पाटील यांनी गल्लीतील नळांना पाणी सोडले. पाहता पाहता जमावाने घरावर चढून जुनी काळी कौले काढून पाणी ओतण्यास सुरुवात केली. तथापि रखरखत्या उन्हात आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग आटोक्यात येईपर्यंत घर व आतील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आगीची झळ शेजारच्या दोन घरांनाही बसली. 

   यावेळी तीनही घरांमध्ये माणसे किंवा जनावर नसल्यामुळे जीवित हानी टळली. दरम्यान कोणीतरी अग्निशमन बंब ला फोन करून सांगितले तथापि बंब चंदगडहून हलकर्णीला येईपर्यंत बंब हलकर्णीला येईपर्यंत सर्व संपले होते. यामुळे बंब ला तिथूनच परत पाठवण्यात आले. घटनेचा पंचनामा अद्याप झालेला नसून आगीत घराचे व संसार उपयोगी साहित्याचे मिळून दहा लाखापर्यंतचे नुकसान झाल्याचा अंदाज घटनास्थळावरून व्यक्त करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment