पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांना निवेदन देताना सराफ संघटनेचे सदस्य |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
सराफ व्यावसायिक बाळकृष्ण अनंत सोनार यांच्यामारेकऱ्याला कठोर शिक्षा द्यावी. या मागणीचे निवेदन चंदगड तालुका सराफ संघटनेच्या वतीने चंदगडचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांना नुकतेच देण्यात आले आहे.
२७ फेब्रुवारी २०२४ रोजी बाळकृष्ण अनंत सोनार, वय ६८ रा. तुडये (मूळ गाव कालकुंद्री) ता. चंदगड या सराफ व्यावसायिकाची उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने तिलारी जंगल परिसरात हत्या करण्यात आली होती. अशाप्रकारे सराफ व्यावसायिकाची हत्या होण्याची ही चंदगड तालुक्यातील पहिलीच घटना असावी. सराफ व सोनार व्यवसायिक यापूर्वी फिरुन निर्धास्तपणे आपला व्यवसाय करत. तथापि या घटनेने चंदगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा व सीमा भागातील व्यवसायिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण पसरले आहे. व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेलेला आपल्या कुटुंबातील सदस्य पुन्हा घरी परत येईपर्यंत कुटुंबांतील सदस्यांना चिंता सतावत आहे.
बाळकृष्ण सोनार यांच्या या खुनाचा करावा तेवढा निषेध कमीच असून त्यांच्या मारेकऱ्याला पोलिसांनी घटनेच्या दिवशीच रंगेहात पकडले आहे. बाळकृष्ण यांचा मृत्यूपूर्व जबाब व्हिडिओ स्वरूपातही उपलब्ध आहे. यावरून पोलीसांनी या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा लवकरात लवकर द्यावी. या मागणी बरोबरच त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांची झालेली परवड लक्षात घेऊन शासनाने त्यांच्या मुलाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी चंदगड व बेळगाव सीमा भागातील सराफ ही व्यवसाय उपस्थित होते.
No comments:
Post a Comment