चंदगड डेपोची कालकुंद्री- बेळगाव बस अनियमित, कर्नाटक डेपोची बस सुरू करण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2024

चंदगड डेपोची कालकुंद्री- बेळगाव बस अनियमित, कर्नाटक डेपोची बस सुरू करण्याची मागणी


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड आगाराची बेळगाव- कालकुंद्री- बेळगाव ही बस गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून याबाबत आगार प्रमुखांना लेखी तोंडी अर्ज विनंत्या व रास्ता रोको आंदोलन ही करून झाले. तरीही आठवड्यातील २-३ दिवस बस येत नसल्यामुळे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. संतप्त ग्रामस्थांनी चंदगड आगाराची बस बंद करून त्या ऐवजी बेळगाव (कर्नाटक) डेपोची बस सुरू करावी अशी मागणी केली आहे.

   मार्गावरील प्रवाशांच्या मागणीनुसार १५-१६ वर्षांपूर्वी तत्कालीन आगारप्रमुख सुनील जाधव यांनी ही बस सुरू केली आहे. दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत चंदगड आगाराच्या सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या बस मध्ये या फेरीची गणना होत होती. तथापि कोरोना व त्यानंतर च्या काळात आलेल्या अधिकाऱ्यांच्या मनमानी मुळे बस फेऱ्या अनियमित झाल्या आहेत. परिणामी बसचे उत्पन्न कमालीचे घटल्याचे समजते. चंदगड आगाराकडून एखादी बस फेरी कमी करायची असेल तर कालकुंद्री फेरीवरच घाला घातला जातो. 

       ही बस रोज दुपारी १२.३० वाजता चंदगड मधून निघून कालकुंद्री व पुढे कुदनुर, दिंडलकोप, कंग्राळी मार्गे बेळगाव येथे जाते. दोन फेऱ्या करून मुक्काम कालकुंद्री व दुसऱ्या दिवशी सकाळी दोन फेऱ्या करून पुन्हा चंदगडला जाते. या मार्गावर सुमारे ३० थांबे असून महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रवासी मोठ्या संख्येने या बसने प्रवास करतात. त्यामुळे सुरुवातीपासून ही बस फायद्यात होती. तथापि आगारातील अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे बसचे उत्पन्न घटले असून रोजचे १०-१२ हजारांचे उत्पन्न निम्म्याच्या खाली आल्याचे समजते. तालुक्यातील अनेक मार्गावरील फेऱ्यांची हीच अवस्था आहे. रोजच्या रडगाण्याला कंटाळून मार्गावरील ग्रामस्थ व प्रवाशांनी बेभरवशाची चंदगड आगाराची बस बंद करून  बेळगाव डेपोची बस सुरू करावी. मार्गावरील ग्रामपंचायतींनी तशा प्रकारचे ठराव बेळगाव आगारप्रमुखांना द्यावेत. असा दबाव वाढत आहे. याबाबत बेळगाव आगार प्रमुखांशी संपर्क साधला असता मागणी करा, दोन दिवसात बस सुरू करतो अशी असे सांगितल्याचे समजते.

No comments:

Post a Comment