खामदळे येथे आठ गवत गंज्यासह काजू,बांबूची बेटे जळून खाक, चार लाखाचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2024

खामदळे येथे आठ गवत गंज्यासह काजू,बांबूची बेटे जळून खाक, चार लाखाचे नुकसान

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         खामदळे (ता. चंदगड) येथील शेतात असलेल्या ८ गवत  गंज्यासह जनावरांचा गोठा , काजू बाग, बांबूची बेटे अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली. आप्पाजी कृष्णा कोल्हाळ, सदानंद सोमाना कोल्हाळ, नारायण सोमाना कोल्हाळ या शेतकऱ्यांचे अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे. या आगीत सुदैवाने जनावरे वाचली.ही आग काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लागली. 

   कुंभयाचे माळ नावाच्या शेतात कोल्हाळ बंधूंच्या गवत गंज्या, राहण्यासाठी व शेतीची औजारे, खते ठेवण्यासाठी व जनावरांचा गोठा,काजूची झाडे, बांबूची बेटे या आगीत जळून चार लाखापेक्षा जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. काल कोल्हाळ बंधूसह संपूर्ण ग्रामस्थ गावातील मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बैठक सुरू होती. यावेळी अचानक धुराचे लोळ निदर्शनास आल्याने ग्रामस्थ कोल्हाळ यांच्या शेताकडे धावले. यावेळी गोठ्यातील जनावरे सोडल्याने बचावली. उन्हाच्या तडाख्यात लागलेल्या आगीने रौद्र रूप इतके भयानक होते की क्षणार्धात गवत गंज्या जळून खाक झाले. कोल्हाळ यांच्या शेतातील काजूची जुनी ४० व नवीन ५० झाडे तसेच बांबूची बेटे व जनावरांचा गोठा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीत चार लाखापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात गवत गंज्या जळाल्याने जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून नुकसान ग्रस्त शेकर्याना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment