कोवाड ताम्रपर्णी नदी पुलावरील पार्किंग झाले बंद, प्रवासी वाहनधारकांत समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2024

कोवाड ताम्रपर्णी नदी पुलावरील पार्किंग झाले बंद, प्रवासी वाहनधारकांत समाधान

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

       चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र तसेच महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला कर्नाटक राज्याशी जोडणाऱ्या कोवाड येथील ताम्रपर्णी नदीवरील पूल गेल्या काही वर्षापासून पार्किंगच्या विळख्यात सापडला होता. या प्रश्नी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनामुळे या पुलाने गेल्या ४-५ दिवसांपासून मोकळा श्वास घेतला आहे.

      वाहतुकीच्या सुलभतेसाठी बांधण्यात आलेला कोवाड येथील हा पूल पार्किंगचा अड्डा बनला होता.  पुलावर दूतर्फा जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक, दुचाकी, चारचाकी वाहनांचे नेहमी पार्किंग केले जायचे. याकडे कोवाड ग्रामपंचायत व पोलिस विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.  गुरुवार दि २८ फेब्रुवारी पर्यंत पुलावरील पार्किंग बंद करून वाहनांना शिस्त न लावल्यास पार्किंग केलेल्या वाहनातील हवा सोडण्यासह वाहने नदीत ढकलून देऊ, असा इशारा तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर व शिवसैनिकांनी दिला होता. याची दखल घेत ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने येथे इशारा फलक लावून पुलावरील पार्किंग पूर्ण बंद केले आहे. आज गुरुवार दि. ७ रोजी ग्रामपंचायत कर्मचारी कोणीही वाहने पार्किंग करू नये यासाठी पुलावर दिवसभर तैनात होते. ग्रामपंचायत कोवाड कडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. यामुळे चंदगड, माणगाव, गडहिंग्लज, नेसरी, कामेवाडी, कोवाड कडून बेळगाव, कालकुंद्री, राजगोळी, ढोलगरवाडी आदी ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या वाहनधारक व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

       या पार्किंगमुळे  महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक, वैद्यकीय, बँकिंग व दळणवळणाचे केंद्र असलेल्या कोवाड बाजारपेठेत वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती. गळीत हंगामात ऊसाने भरलेली व रिकामी ट्रॅक्टर आदी वाहने बराच वेळ पुलावर पार्किंग केली जायची. गुरुवारच्या आठवडी बाजार दिवशी यात अधिकच भर पडायची यामुळे व्यापारी, ग्रामस्थ व वाहनधारक  त्रस्त झाले होते.

       एकीकडे पुलावरील पार्किंग बंद झाल्याचे समाधान असले तरी आत्ता वाहने कुठे पार्किंग करायची हा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. लवकरच येणाऱ्या लग्न सराई काळात बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला पार्किंग व्यवस्थेसाठी तात्काळ अन्य पर्याय शोधावा लागणार आहे.


No comments:

Post a Comment