निट्टूर कुस्ती मैदानात पै शिवानंद दड्डीने केले पै सुनील करवतेला चितपट, दोन नंबर ची कुस्ती बरोबरीत...!, ६० काटाजोड कुस्त्यांसह महिला कुस्त्यांचेही आकर्षण - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2024

निट्टूर कुस्ती मैदानात पै शिवानंद दड्डीने केले पै सुनील करवतेला चितपट, दोन नंबर ची कुस्ती बरोबरीत...!, ६० काटाजोड कुस्त्यांसह महिला कुस्त्यांचेही आकर्षण

क्रमांक दोनच्या  कुस्तीतील एक क्षण

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

     गुढीपाडव्यानिमित्त आयोजित निट्टूर (ता. चंदगड) येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत कर्नाटक चॅम्पियन पै. शिवानंद दड्डी (दर्गा तालीम बेळगाव) याने तुलनेने बोजड असलेल्या पै. सुनील करवते कवठेपिराण याला सहाव्या मिनिटात दुहेरी पट काढत आस्मान दाखवले. यावेळी जमलेल्या हजारो कुस्ती शौकिनांनी जल्लोष करत पै. शिवानंद याचे कौतुक केले. दुसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्र चॅम्पियन कीर्तिकुमार बेनके व प्रतिक मेहतर हनुमान आखाडा राशिवडे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. तथापि कुस्तीतील बहुतांश वेळ आपल्यापेक्षा ताकतवर कीर्तीकुमार वर प्रतिकने ताबा ठेवला होता.

      आखाड्याचे पूजन महाराष्ट्र चॅम्पियन माजी कुस्तीगीर नरसू पाटील व भारत खवणेवाडकर यांच्या हस्ते झाले. मैदानात झालेल्या ६० पेक्षा अधिक कुस्त्यांपैकी बहुतांश कुस्त्या नेत्रदीपक व कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या ठरल्या. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन विक्रम शिनोळी याने आदित्य पाटील कवठेपिराण वर डंकी डावावर प्रेक्षणीय विजय मिळवला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत रोहित कंग्राळी याला प्रतिस्पर्धी पैलवान गौस कुंदर्गी बेळगाव हा जखमी झाल्यामुळे विजयी घोषित करण्यात आले. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत पार्थ कंग्राळी यांने अध्ययन एडके कवठेपिरान याला  गुणावर पराभूत केले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत ओमकार पाटील राशिवडे यांने चिन्मय येळ्ळूर याला पराभूत केले, सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत रोहित चव्हाण कवठेपिराण याने दुहेरी पट काढत साईनाथ नाईक कंग्राळी यास पराभूत केले. आठ नंबरच्या कुस्तीत प्रवीण निलजी याने रोहन चव्हाण कवठेपिरान याला पराभूत केले. वैभव राशिवडे व विक्रम गावडे तुर्केवाडी यांच्यातील ९ नंबरची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. याशिवाय अनुक्रमे शुभम पाटील तेऊरवाडी याने अक्षय कडोली यास, करण देसाई राशीवडे यांने निरंजन यळ्ळुर यास, ओमकार देसाई राशीवडे यांने विनायक यळ्ळुर यास, गणेश सरवणकर मलतवाडी याने श्रीकांत शिंदोळी बेळगाव यास, कुलदीप पाटील राशिवडे यांनी संजू चिम्मड बेळगाव यास, प्रणव उचगाव यांने शुभम पाटील निट्टूर यास, रोहित पाटील निट्टूर याने मारुती कार्वे यास, भरत मुतगा यांने किसन चौगुले कंग्राळी यास, उत्कर्ष बोडकेनहट्टी याने अजिंक्य संपकाळ कवठेपिरान यास पराभूत करून प्रेक्षणीय विजय मिळवले. याशिवाय भीमा गंगाराम कुरबुर यांच्या वतीने दरवर्षी ठेवण्यात आलेल्या जंगी मेंढ्याची कुस्ती यंदा कार्तिक जाधव निट्टूर याने जिंकली. तर दुसऱ्या एका कुस्तीत मानाचा चषक अजित कुद्रेमानीकर बडस यांने पटकावला.

एक नंबरची कुस्ती लावताना भरत कुंडल व इतर

        याशिवाय महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी लावण्यात आलेल्या मुलींच्या कुस्त्यांनाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कुस्त्या लावण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार विजेते क्रीडा प्रशिक्षक रामराव गुडाजी (तेऊरवाडी) व पी जे मोहनगेकर (किणी) यांनी पुढाकार घेतला. यावेळी प्रगती पाटील विरुद्ध सृष्टी पाटील, संजीवनी विरुद्ध पूजा, शिवानी विरुद्ध जान्हवी, सुकन्या विरुद्ध आरोही यांच्यातील कुस्त्या लक्षवेधी ठरल्या.

         सुमारे सहा तास चाललेल्या या कुस्ती मैदानात आमदार राजेश पाटील, माजी  रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील, कल्लाप्पाण्णा भोगण आदी राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आचारसंहितेमुळे प्रेक्षकांमध्ये बसूनच त्यांनी कुस्त्यांचा आनंद लुटला. आखाडा पंच म्हणून गावडू पाटील, भैरू पाटील, एन जी पाटील, लक्ष्मण भिंगुडे, मारुती खंडाळे आदींनी काम पाहिले, कृष्णात चौगुले यांचे धावते समालोचन व हनुमंत घुले यांच्या रणहलगीने मैदानात उत्साह संचारला होता. 

No comments:

Post a Comment