कुदनूर कुस्ती मैदानात पै. प्रेम कंग्राळी विजयी, चटकदार ६० कुस्त्यांसह महिला कुस्त्याही लक्षवेधी - चंदगड लाईव्ह न्युज

25 April 2024

कुदनूर कुस्ती मैदानात पै. प्रेम कंग्राळी विजयी, चटकदार ६० कुस्त्यांसह महिला कुस्त्याही लक्षवेधी

  

प्रथम क्रमांकची कुस्ती लावताना सुरेश घाटगे, माजी जि. प. सदस्य शंकर आंबेवडकर, एम. जे. पाटील आदी

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा

   हनुमान जयंतीनिमित्त ग्रामपंचायत व ग्रामस्थ कुदनूर (ता. चंदगड) आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती व 'सरपंच श्री' किताब कंग्राळीच्या पै. प्रेम पाटील यांने पटकावला. हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत त्याने कर्नाटक केसरी पै. श्रवणकुमार गुलबर्गा (दर्गा तालीम बेळगाव) याला ५ मिनिटात घुटना डावावर चितपट केले. ही कुस्ती उद्योजक सुरेश घाटगे, शंकर आंबेवाडकर, एम. जे. पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली.

       क्रमांक दोनची पै. निरंजन (यळ्ळूर) विरुद्ध विक्रम गावडे (शिनोळी), क्र. तीनची शुभम पाटील (तेऊरवाडी)  विरुद्ध निखिल पाटील कंग्राळी याशिवाय यश कंग्राळी विरुद्ध उत्कर्ष बोडकेनहट्टी, या महत्त्वाच्या कुस्त्या बरोबरीत सुटल्याने शौकीनांची निराशा झाली. 

   क्र. चारच्या कुस्तीत कुणाल येळ्ळूर ने सुरज उचगाव याला एक चाक डावावर तर क्र. पाचच्या कुस्तीत ओम कंग्राळी याने कुबेर पिरनवाडी याला घुटना डावावर अस्मान दाखवले. याशिवाय मैदानात ओमकार कडोली विजयी विरुद्ध यल्लाप्पा तुर्केवाडी, प्रज्वल मच्छे विजयी विरुद्ध आदित्य कंग्राळी, विशाल पाटील निट्टूर विजयी विरुद्ध सौरभ सुतार तुर्केवाडी, वैजनाथ मौजे कार्वे विजयी विरुद्ध मंथन सांबरा, अमर बंबरगा विजयी विरुद्ध ज्ञानेश्वर तुर्केवाडी या कुस्त्या प्रेक्षणीय ठरल्या. मुलींच्या कुस्तीत शर्वरी गणाचारी, साक्षी पाटील, शर्वरी बिर्जे, प्रगती पाटील, सृष्टी पाटील, शिवानी पाटील यांनी चुणूक दाखवली.

        आखाड्याचे पूजन मारुती खामकर व दऱ्याप्पा कुंभार यांच्या हस्ते झाले. मैदानी पंच म्हणून मारुती खंदाळे, लक्ष्मण भिंगुडे, महादेव पाटील, गावडू पाटील, शंकर पाटील आदींनी काम पाहिले. धावते समालोचन रामदास गायकवाड यांनी केले. सिद्राम गुंडकल व सी. बी. निर्मळकर यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी एस. एन. राजगोळकर, बी. जी. जाधव, पी. बी. पाटील, बी. एस. मुतकेकर, शशिकांत सुतार, चंद्रकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment