७० वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्याकडून ढोलगरवाडी शाळेस आर्थिक मदत - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2024

७० वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्याकडून ढोलगरवाडी शाळेस आर्थिक मदत



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     ७० वर्षांपूर्वी म्हणजे सन १९६० पूर्वी ढोलगरवाडी ता. चंदगड येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या ८५ वर्षीय प्राध्यापक बी आर फर्नांडिस यांनी गावातील मामासाहेब लाड विद्यालय या माध्यमिक शाळेस भेट देऊन २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. सध्या पुणे येथे स्थायिक असलेल्या फर्नांडिस यांनी मागे वळून पाहताना विद्यार्थी दशेत योग्य संस्कार करून आपल्याला घडवणाऱ्या जन्मभूमीला नुकतीच भेट देत ऋण व्यक्त केले. मुख्याध्यापक एन जी यळ्ळुरकर यांनी स्वागत केले.

    अनेक मोठमोठ्यांचे सल्लागार कंपन्यांचे सल्लागार असलेले प्रा फर्नांडिस या वयातही पुण्यातील विद्यार्थ्यांना अकाउंट, ऑडिट क्षेत्रातील मार्गदर्शन करतात. ते वेंकटेश्वरा फूड्स कंपनीचे आर्थिक सल्लागार असून विविध कंपन्यांमध्ये त्यांनी राबवलेल्या योजना सध्या पुण्यात फर्नांडिस पॅटर्न या नावाने प्रसिद्ध आहेत. यावेळी झालेल्या स्वागत व सत्कार प्रसंगी त्यांनी १९६० ते ७० या काळातील गाव व परिसर कसा होता? आपण येथे कसे घडलो? याबद्दलची माहिती सांगताना विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करावा आपल्यात गुणवत्ता असेल तर आपल्याला नोकरी शोधावी लागणार नाही, लोकच आपल्याला शोधत येतील असे सांगितले. गावचे वैशिष्ट्य असलेली सर्पशाळा टिकली पाहिजे व वाढली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा फर्नांडिस यांनी दिलेली आर्थिक मदत फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून यातून दहावीतील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता बक्षीस योजना ठेवली जाईल असे यावेळी सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील यांनी सांगितले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह फर्नांडिस यांचे वर्गमित्र लक्ष्मण कदम उपस्थित होते. प्रा एन जी चांदेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment