‘पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धा ९ जूनला, ६ गटात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2024

‘पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धा ९ जूनला, ६ गटात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

    आउट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पुढाकाराने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऐतिहासिक किल्ले पारगड वर दरवर्षी होणारी 'पारगड हेरिटेज रन' मॅरेथॉन स्पर्धा यंदा ९ जून रोजी होत आहे. निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन व लोक प्रबोधनासाठी या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. 

       आयोजक आउट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशन व सहसंयोजक किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई, ग्रुप ग्रामपंचायत मिरवेल, पारगड नामखोल, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ॲडव्हेंचर एलएलपी, स्टाफ इंडिया  यांच्या वतीने ९ जून २०२४ रोजी होणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा देशभरातील धावपटूंसाठी एक आव्हान असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पारगड किल्ल्यावरून स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव धावपटूंसाठी रोमांचकारी ठरणार आहे.



     स्पर्धा ‘जॉय ऑफ जंगल’ ५ किमी. ‘जंगल ड्रीम रन’ १० किमी व ‘जंगल हाफ मॅरेथॉन’ २१ किमी अशा तीन श्रेणीमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र आहे. स्पर्धेतील सर्व गटातील विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.  ‘निसर्गाचे रक्षक' मोहिमेंतर्गत निसर्ग संवर्धन, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन, कचऱ्याचे पुनर्विनीकरण, नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षमता या पाच उद्दिष्टांच्या प्रबोधना बरोबरच क्रीडा, शारीरिक शिक्षण व युवक कल्याण विषयक उपक्रमांसाठी जनजागृती निर्माण व्हावी व महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा या हेतूने स्पर्धेचे आयोजन केले जाते.

      स्पर्धेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे - ९ जून सकाळी ५ वाजता स्पर्धकांचे आगमन, कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती व नाष्टा, ६ ते ७ उद्घाटन व स्पर्धा प्रारंभ, ९ ते ११ पारितोषिक वितरण, निसर्ग संवर्धन विषयी मार्गदर्शन व परिसरात वृक्षारोपण होणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. 



      स्पर्धेची सुरुवात व सांगता भवानी मंदिर पारगड येथे होणार असून स्पर्धा मार्गावर ठिकठिकाणी रेस मार्शलच्या नजरेखालील चेक पॉईंट, रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, ग्लुकोज आदी सुविधा उपलब्ध असतील. सहभागी सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र, फळझाडाचे रोपटे, टी-शर्ट तर विजेत्यांना पदक व रोख बक्षीसे दिली जातील. 

      दि. ८ रोजी येणाऱ्या स्पर्धक व व्यवस्थापक यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था गडावर असेल. सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य असून ऑनलाइन नोंदणी व अधिक माहितीसाठी www.pargad.in या वेबसाईटला भेट द्यावी. असे आवाहन स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे व किल्ले पारगड जनकल्याण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment