आश्वासनांच्या पावसात पारगडचे तलाव कोरडेच...!, नपापु विभागाचे दुर्लक्ष..! शिवसेनेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2024

आश्वासनांच्या पावसात पारगडचे तलाव कोरडेच...!, नपापु विभागाचे दुर्लक्ष..! शिवसेनेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी

 

मागणीचे निवेदन देताना शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख दिवाकर पाटील, चंदगड शहर प्रमुख यशवंत डेळेकर, शहर संघटक सुरेश जुवेकर, पारगडचे ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        गेल्या आठ-दहा वर्षात तालुक्यातील नळ पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांचा पाऊस सुरू असला तरी ऐतिहासिक किल्ले पारगड वरील तलाव मात्र कोरडेच राहिले आहेत. यामुळे किल्ले पारगड वरील ग्रामस्थांचे हाल सुरू झाले आहेत. त्याचबरोबर येथे रोज येणाऱ्या शेकडो इतिहास प्रेमी पर्यटकांची पाण्याअभावी कुचंबणा होत आहे. गडावर तसेच गडाखालील आंबेडकर नगर रहिवाशांसाठी तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख दिवाकर पाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

           शिवकाळापासून म्हणजेच सुमारे 400 वर्षापासून किल्ले पारगड वरील गणेश, गुंजन, फाटक, महादेव असे चार तलाव गडावरील मावळ्यांची तहान भागवत आहेत. पंचवीस तीस वर्षांपूर्वी पर्यंत या तलावातील पाणी ग्रामस्थांना पुरायचे पण अलीकडच्या काळात पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे येथील तलाव व  विहिरीतील पाणी मार्च अखेरपर्यंत संपून जात आहे. पाण्याच्या सोयीसाठी येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषणासारखी अनेक आंदोलने गेल्या दहा पंधरा वर्षात केली असली तरी अद्याप ग्रामस्थांची तहान भागलेली नाही. गेली चार-पाच वर्षे पाण्याचे स्रोत शोधण्यातच गेली आहेत यावर्षी तलाव कोरडे पडण्यापूर्वी पाणी गडावर पोहोचेल असे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागामार्फत सांगण्यात आले होते. पण या केवळ वल्गनाच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  परिणामी मार्च महिन्यानंतर म्हणजेच एप्रिल, मे व जून महिन्यात पावसाळा सुरू होईपर्यंत येथील ग्रामस्थांवर अन्यत्र स्थलांतरित होण्याची नामुष्की यंदाही ओढवली आहे. 

      ग्रामस्थ अर्ज, विनंत्या, आंदोलने, उपोषणे करून थकले पण निर्ढावलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांना काही पाझर फुटला नाही. त्यांच्यासह तालुक्यातील विविध लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनेच सुरू आहेत. सद्यःस्थितीत गडावरील सर्व तलाव व विहिरी कोरड्या झाल्याने भीषण पाणीटंचाई सुरू आहे. गडावरील तसेच गडाच्या पायथ्याशी असलेल्या दलित वस्तीतील ग्रामस्थांची हाल पाहून शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख दिवाकर पाटील, चंदगड शहर प्रमुख यशवंत डेळेकर, शहर संघटक सुरेश जुवेकर, पारगडचे ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे आदींनी तहसीलदार चंदगड तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती चंदगड यांना या पाणी टंचाईची दखल घेऊन तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कोल्हापूर व प्रांताधिकारी गडहिंग्लज यांनाही देण्यात आल्या आहेत. तर गडावरील रहिवाशांनी सर्व तलाव टँकरद्वारे भरुन देण्यात यावे अशी मागणी केली आहे.


No comments:

Post a Comment