चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
काल दि. 29/05/2024 रोजी चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कार्यात भागात कागणी, कोवाड, तेऊरवाडी या तीन गावात सात ठिकाणी घर फोड्या करून चोरट्याने एकच खळबळ उडवून दिली आहे. कर्यात भागासह जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
कोवाड (तेऊरवाडी रोड) येथील हॉटेल व्यवसायिकाच्या बंद घराचे कुलूप कटावणीने उचकटून घरातील सुमारे 5 लाख 87 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रुपये 65 हजार असा सर्व मिळून 6 लाख 52 हजार रुपये किमतीचा तर शेजारच्या सुभाष नारायण अतवाडकर यांच्या घरातील तीन तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्याने लंपास केला. जोतिबा जानबा अस्वले यांच्या घरीही चोरट्याने डल्ला मारण्याचा प्रयत्न केला तथापि त्याच्या हाती काही लागले नाही. या घटनांची नोंद चंदगड पोलीस ठाण्यात झाली आहे.
कोवाड येथील हॉटेल व्यावसायिक श्रीकांत निंगाप्पा पाटील हे काल दिनांक 29 मे 2024 रोजी पत्नी मुलगा व स्वतः असे तिघेजण तेऊरवाडी रोड येथील राहत्या घरी कुलूप लावून बेळगाव येथे दवाखान्यात गेले होते. सकाळी साडेदहा ते अडीच वाजण्याचे दरम्यान त्यांच्या घराची कडी कोयंडा व कुलूप कटावणीने उचकटून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व घरातील वरील प्रमाणे 11 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. जाताजाता शेजारी राहणाऱ्या सुभाष नारायण आतवाडकर यांच्या घरातील तीन तोळ्याचे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला तर जोतिबा जानबा अस्वले यांच्या घरी केलेल्या चोरीच्या प्रयत्नात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
काल अशाच पद्धतीने कागणी येथील लक्ष्मण सट्टूप्पा भोगण व जोतिबा भरमू बाचुळकर यांच्या घराचे कुलूप कडी तोडून चोरट्याने अनुक्रमे 6 लाख 25 हजार व 6 लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. तर तेऊरवाडी येथील सुशीला यशवंत पाटील व राणबा दत्तू पाटील यांच्या घरातील रोख रक्कम चोरट्याने लांबवली.
कोवाड परिसरात एकाच दिवसात सात ठिकाणी घरपोडी करून चोरट्याने सुमारे 20 लाखांपेक्षा अधिक रकमेचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याने चंदगड पोलिसांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे राहिले आहे. तीन वर्षांपूर्वीही चोरट्याने सलग घर फोड्या करून दहशत निर्माण केली होती. त्यातील एका घरफोडीतील काही ऐवज मालकांना वर्षानंतर पुन्हा मिळाल्याचे समजते.
घरफोड्यांच्या गेल्या काही वर्षातील घटना पाहता येत्या दोन-चार दिवसात पुन्हा अशा घटना घडण्याची शक्यता परिसरात व्यक्त होत आहेत. पूर्वी शक्यतो रात्रीच्या वेळी चोऱ्या व घरफोड्या व्हायच्या. यातून गावोगावी तरुणांची गस्ती पथके तैनात करण्यात आली होती. तथापि यातूनही 'मार्ग काढत' चोरट्यांनी आता दिवसा ढवळ्या 'चोऱ्या करण्याची कला?' आत्मसात केल्याचे अलीकडील घरफोडीच्या घटना वरून लक्षात येत आहे. ठराविक पद्धतीने घडणाऱ्या अशा घरफोडीच्या घटना पोलिसांसमोर निश्चितच आव्हान उभे करणारे आहेत.
No comments:
Post a Comment