चंदगड तालुक्यात खाणीकर्म विभागाची धडक कारवाई...! १० डंपर, १ जेसीबी व खनिजासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2024

चंदगड तालुक्यात खाणीकर्म विभागाची धडक कारवाई...! १० डंपर, १ जेसीबी व खनिजासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

खनिजासह जप्त करण्यात आलेले डंपर चंदगड तहसील कार्यालयाच्या परिसरात आवारात लावण्यात आले आहेत

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        राजगोळी खुर्द नजीक तिरमाळ (ता. चंदगड) गावाच्या परिसरातून उत्खनने केलेले व १० डंपर मध्ये भरलेले सुमारे सव्वा चार लाख रुपयांचे गौण खनिज डंपरसह जप्त करण्याची धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई ३० जून २०२४ रोजी पहाटे अडीच वाजल्यापासून जिल्हा खणीकर्म अधिकारी आनंद पाटील व तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली. यामुळे खनिज उत्खनन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

      या घटनेबाबत तहसिल कार्यालयातून मिळालेली माहिती अशी की, वरील परिसरात अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी रात्री अचानक धाड घातली. कारवाईत एकूण १० डंपर मध्ये भरलेले ४९ ब्रास खनिज जप्त करण्यात आले असून एका ब्रास खनिजाची किंमत ८६५० रुपये असल्याचे सांगण्यात आले. यावरून जप्त केलेल्या एकूण खनिजाची किंमत अंदाजे रुपये ४ लाख २३ हजार ८५० इतकी होते. तर वाहनासाठी अंदाजे सुमारे ४० ते ४५ लाख एवढी किंमत होते. या कारवाईत दहा डंपर व एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आले असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कारवाईची पोलिसात नोंद झालेली नाही. जप्त केलेले सर्व डंपर मुद्देमालासह चंदगड तहसील कार्यालय आवारात आणण्यात आले असून पुढील कारवाई जिल्हा खणीकर्म विभागाच्या वतीने सुरू आहे.

   आज सकाळी सकाळी तिरमाळ परिसरातून मागे पुढे अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा व  मध्ये खनिज भरलेल्या टिप्पर चा ताफा राजगोळी परिसरातून येत असताना नागरिकांत तर्क वितर्क व उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. परिसरातील नागरिक याबद्दल पत्रकारांकडे विचारणा करत होते. दरम्यान संयुक्त पथकाच्या या कारवाईत आनंद पाटील (जिल्हा खाणीकर्म अधिकारी), राजेश चव्हाण, (तहसीलदार चंदगड), हेमंत कामत (निवासी नायब तहसीलदार), अशोक पाटील (नायब तहसीलदार महसूल), गावित (जिल्हा खाणीकर्म विभाग, कोल्हापुर, शरद मगदुम (मंडळ अधिकारी कोवाड, परिसरातील तलाठी अक्षय कोळी, प्रशांत पाटील, गणेश रहाटे, शुभम मुंडे, सुनील सोमशेट्टी, अरुण शिंदे, महसूल सहाय्यक  ⁠गौस मकानदार, ⁠दीपक आंबी आदींचा समावेश होता.

No comments:

Post a Comment