संकेश्वर- हिटणी गावानजीक नव्या महामार्गावर प्रवेश करताना लावण्यात आलेला हाच तो वादग्रस्त दिशादर्शक फलक
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
नव्याने बांधण्यात आलेल्या संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्गावरील संकेश्वर हिटणी नजीक उभारलेल्या दिशादर्शक फलकावर आजरा, आंबोली, सावंतवाडी, गोवा या शहरांची नावे आहेत. तथापि फलकावर गडहिंग्लज शहराला स्थान दिलेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या फलकावर गडहिंग्लज चे नाव समाविष्ट न केल्यास फलक उकडून टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ चे काम पूर्ण होत आहे. अंतिम टप्प्यातील किरकोळ कामे सुरू असून ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे. असाच एक फलक संकेश्वर नजीक असलेल्या हिटणी गावाजवळ उभारण्यात आला आहे. या फलकावर गडहिंग्लज शहराच्या नावाचा उल्लेख नाही. संकेश्वर पासून पंधरा किमी अंतरावरील गडहिंग्लज हे महत्त्वाची बाजारपेठ असलेले शहर आहे. शहराच्या मध्यभागातून हा महामार्ग जात असूनही पुणे- बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गापासून कोकणात प्रवेश करणाऱ्या पहिल्याच प्रवेशद्वारावर गडहिंग्लज शहराचा उल्लेख नसल्याने बाहेरून येणाऱ्या प्रवासी व वाहन चालकांत संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे.
दुसरीकडे हा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याची भावना व्यक्त होत असून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान या दिशादर्शक फलकावर गडहिंग्लज शहराचे नाव संबंधित अधिकाऱ्यांना सांगून तात्काळ समाविष्ट करावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदर वादग्रस्त फलक उखडून टाकण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी यांना नुकतेच देण्यात आले आहे.
फोटो
No comments:
Post a Comment