विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी, २५ जून ते २४ जुलै कार्यक्रम, २५ जुलै रोजी नवीन यादीची प्रसिद्धी - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2024

विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी, २५ जून ते २४ जुलै कार्यक्रम, २५ जुलै रोजी नवीन यादीची प्रसिद्धी



चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
  भारत निवडणूक आयोगाने हरियाणा, झारखंड व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीचे संक्षिप्त पुनरिक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात केंद्रस्तरीय मतदार अधिकारी (बीएलओ) यांचे मार्फत घर टू घर भेटी देऊन मतदार यादी अपडेट करण्याचे काम २५ जून पासून सुरू करण्यात आले आहे. अपडेट झालेली प्रारूप मतदार यादी २५ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याची ही शेवटची संधी असणार आहे.
   नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या. त्या अनुषंगाने तसेच १ जुलै २०२४ रोजी ज्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाली  आहेत अशा व्यक्तींना मतदार यादीत आपले नाव नोंद करता येणार आहे. मतदार यादीत कोणते मुद्दे पूर्ण करणे आवश्यक आहे. याची माहिती मल्लिकार्जुन माने मतदार नोंदणी अधिकारी २७१ चंदगड विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांनी नुकतीच चंदगड तालुक्यातील बीएलओ व पर्यवेक्षक यांना दिली. यावेळी राजेश चव्हाण सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार चंदगड, सुरेश दळवी निवडणूक नायब तहसीलदार चंदगड व अमर साळुंखे निवडणूक महसूल सहाय्यक उपस्थित होते.
   या कार्यक्रमांतर्गत विविध कारणांनी वगळणी झालेल्या मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करणे, १८ वर्षांवरील नव मतदारांची नोंदणी करणे, एकाच कुटुंबातील विखुरलेल्या मतदारांची  एकाच केंद्रावर नोंदणी करणे, मतदार ओळखपत्रावरील नाव, पत्ता, खराब, अस्पष्ट फोटो इत्यादी त्रुटी दुरुस्त करणे मतदान केंद्रे सर्व सुविधांनी युक्त असल्याची खात्री करणे, मयत स्थलांतरित, दुबार मतदारांची वगळणी करणे. आदी कामे पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत केली जाणार आहेत.  १ जुलै २०२४ हा अर्हता दिनांक धरून सुरू असलेला मतदार नोंदणी व मतदार यादी सक्षमीकरणाचे कार्य यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी तसेच मतदान केंद्र सुसूत्रीकरण संदर्भात चंदगड तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक या आठवड्यात बोलावणार असल्याचे सांगून नागरिकांनी संबंधित बीएलओ यांना भेटून या कामी सहकार्य करावे. असे आवाहन राजेश चव्हाण तहसीलदार चंदगड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment