जट्टेवाडीत घरास आग, प्रापंचिक साहित्यासह सुमारे लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2024

जट्टेवाडीत घरास आग, प्रापंचिक साहित्यासह सुमारे लाखोंचे नुकसान

 

घराला आग लागून झालेल्या नुकसानी कडे हताशपणे पाहताना पुंडलिक पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

       मजरे जट्टेवाडी (ता. चंदगड) येथे राहत्या घरास आग लागून घरातील प्रापंचिक साहित्यासह घराचे सुमारे तीन लाखापेक्षा अधिकचे नुकसान झाले. घटनेचा पंचनामा तलाठी कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.

       जट्टेवाडी येथील शेतकरी पुंडलिक कृष्णा पाटील यांच्या राहत्या घरास दि ४ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता अचानक आग लागली. यात मंगलोरी कौलांचे छप्पर, घरातील भात व इतर धान्य, खताची पोती, कपडेलत्ते, भांडीकुंडी, शेती अवजारे, औषध फवारणी पंप आदी साहित्य जळून खाक झाले. किमान तीन लाखापेक्षा अधिक रुपयांची नुकसान झाल्याचे शेतकरी पुंडलिक पाटील यांनी सांगितले. घरातील सर्व मंडळी शेताकडे भातरोप लावण्यासाठी गेले होते. सायंकाळी काम संपवून घरी आल्यानंतर पुंडलिक पाटील जनावरांचे दूध  काढून ते घालण्यासाठी डेअरीकडे गेले होते. येत असताना घरातून धूर निघत असल्याचे दिसले. घराला आग लागल्याचे लक्षात येताच गावकरी हाताला मिळेल त्या साहित्यासह आग विझवण्यासाठी सरसावले. तथापि आग आटोक्यात येण्यापूर्वीच प्रापंचिक साहित्य व छप्पर पूर्णपणे जळून खाक झाले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटनास्थळी चर्चा होती. 

       घटनेनंतर तलाठी प्रथमेश देसाई यांनी नुकसानीचा पंचनामा केला, यावेळी सरपंच रेणुका बुवा, उपसरपंच विजय पाटील, ग्रामपं. सदस्य नारायण पाटील, सेवा सोसायटी चेअरमन ईश्वर पाटील, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. आगीची माहिती मिळताच चंदगड पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. गरीब शेतकरी पुंडलिक पाटील यांचे मोठे नुकसान झाले असल्याने त्यांना उचित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.  

अग्निशामक दलाच्या गाडीत पाणीच नव्हते?

      घराला आग लागल्याचे लक्षात येतात काहींनी अग्निशमन बंब मागवण्याचा प्रयत्न केला. यावेळी फोन वरून बंब मागणी केली असता 'गाडीमध्ये पाणी भरलेले नाही, पाणी भरायला वेळ लागेल!' असे सांगण्यात आल्याने ही गंभीर बाब असून याबाबतची चर्चा घटनास्थळावर सुरू होती. शेवटी अग्निशामक दलाचा नाद सोडून ग्रामस्थांनीच आग आटोक्यात आणली. तथापि तोपर्यंत सर्व काही आगीच्या भक्षस्थानी पडले होते. 

No comments:

Post a Comment