एका लोकलढ्याची यशोगाथा' मुळे चळवळीचा सन्मान!, लेखक, कॉम्रेड संपत देसाई यांचा गडहिंग्लजला सत्कार, पुस्तकाचा शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2024

एका लोकलढ्याची यशोगाथा' मुळे चळवळीचा सन्मान!, लेखक, कॉम्रेड संपत देसाई यांचा गडहिंग्लजला सत्कार, पुस्तकाचा शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश


चंदगड / प्रतिनिधी

      श्रमिक मुक्ती दलाचे राज्य निमंत्रक, कॉम्रेड संपत देसाई यांनी लिहिलेल्या 'एका लोकलढ्याची यशोगाथा' या पुस्तकाचा समावेश शिवाजी विद्यापीठाने अभ्यासक्रमात करून चळवळीचा सन्मान केला आहे, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी गडहिंग्लज येथे काढले.

        कॉम्रेड संपत देसाई यांच्या 'एका लोकलढ्याची यशोगाथा' या पुस्तकाचा शिवाजी विद्यापीठाने नुकताच बीए- भाग तीन मराठी विषयाच्या  अभ्यासक्रमात समावेश केला आहे. याबद्दल गडहिंग्लज येथील शासकीय विश्रामगृह येथे कॉम्रेड देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी पुष्पगुच्छ व शाल देऊन कॉम्रेड देसाई यांचा सत्कार करण्यात आला. 

       यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड संपत देसाई हे माझे वर्गमित्र आहेत. वर्गमित्राने पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकाचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला याचा मला सर्वस्वी आनंद व विशेष अभिमान आहे असे सांगून श्री. देसाई यांचे त्यांनी अभिनंदन केले.

         माजी सभापती अमरसिंह चव्हाण म्हणाले, लिहिणे ही गोष्ट तशी सोपी नाही. चळवळीत कार्यकर्ते काम करत असतात. काम करता करता लिहिणं ही कला खूप कमी लोकांना अवगत असते आणि हे संपत देसाई यांनी जपली आहे. जे काम अक्षरात येतं ते कायमस्वरूपी टिकतं. संपत देसाई यांच्या पुस्तकाचा समावेश हा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होणं ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.

     सत्काराबद्दल मनोगत व्यक्त करताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, शिवाजी विद्यापीठाकडून माझ्या पुस्तकाचा झालेला सन्मान हा आजरा व परिसरातील कष्टकऱ्यांच्या चळवळीचा सन्मान आहे. एखाद्या चळवळीवर पुस्तक लिहिणं आणि ते विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये येणं हे निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडून एक चळवळ अभ्यासली जाईल. आजरा तालुक्यातील ही चळवळ केवळ धरणग्रस्तांचा प्रश्न घेऊन उभी राहिली नाही तर येथील सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांबद्दलही बोलली. या माध्यमातून अनेक  कार्यकर्ते तयार झाले. हे पुस्तक धरणग्रस्तांच्या लढ्याबद्दल तर आहेच त्याचबरोबर आजरा परिसरातील निसर्ग, पर्यावरण, प्रथा, परंपरा यांचही दर्शन हे पुस्तक घडवतं. एका बाजूला चळवळीचा 'दस्तावेज' हे पुस्तक आहेच तर दुसऱ्या बाजूला सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणाचाही आरसा आहे. चळवळी कशा उभ्या राहतात, कशा पुढे जातात हे आजच्या पिढीसमोर येणं महत्त्वाचं होतं, हे काम विद्यापीठानं केलं आहे. या पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश करणं हे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या दूरदृष्टीच लक्षण आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचा मी ऋणी आहे. 

     या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, माजी सभापती  अमरसिंह चव्हाण, गोपाळराव पाटील, श्रीमती अंजनाताई रेडेकर, विद्याधर गुरबे, नितीन पाटील, शिवप्रसाद तेली, कॉम्रेड संपत देसाई, संजय तर्डेकर, रियाजभाई शमनजी, राजू रेडेकर, युवराज पोवार, प्रशांत देसाई, शिवाजी माने आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment