कर्यात भागात भात रोपे लावणी अंतिम टप्प्यात; प्रथमच कुरी ऐवजी चिखलातील लावणी - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2024

कर्यात भागात भात रोपे लावणी अंतिम टप्प्यात; प्रथमच कुरी ऐवजी चिखलातील लावणी

 

कालकुंद्री येथील  शिवारात बैलांच्या सहाय्याने चिखल करणारे शेतकरी व चिखलातील भातरोप लावणी करताना महिला.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागातील खरीप भाताच्या ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा बहुतांशी चिखलातील भातरोप लावणी झाली असून कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. परिणामी शेतमजुरांना महत्व आले आहे. 

       यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीस आंतर मशागतीसाठी पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी   धूळपेरणीसाठी तयार ठेवल्या होत्या. तथापि मृग नक्षत्रातील पाऊस अचानक संततधार सुरू झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीची संधी मिळाली नाही. त्यामुळे या भागात पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या कुरीच्या सहाय्याने होणाऱ्या भात पेरणीला ब्रेक बसून सुमारे ९० टक्के पेरण्या खोळंबल्या. सततच्या पावसामुळे भात पेरणी करण्याची संधी न मिळाल्यामुळे शेवटी भागातील शेतकऱ्यांनी यंदा कुरी ऐवजी चिखलातील रोप लावणीचा निर्णय घेत भाताचे तरावे टाकले.

        सध्या सुरू असलेल्या लावणी योग्य पावसामुळे परिसरातील कालकुंद्री, कुदनूर, कोवाड, निट्टूर, नागरदळे, किणी आदी गावातील शेतकरी वर्ग चिखल करून भात लावणीच्या कामात गुंतला आहे. चिखल करण्यासाठी लागणाऱ्या बैल जोड्यांचा तुटवडा भासत असल्याने बाहेरून चिखल करायची यंत्रे आणून चिखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. इकडील काळ्या मातीत चिखल करायचे काम जिकिरीचे असल्यामुळे बैलांची दमछाक होत असून चिखल करायची रोटर यंत्रेही अचानक बंद पडू लागल्याने रोटर मालक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे सर्व कामे एकदम आल्यामुळे परिसरात शेतमजुरांचा तुटवडा असून त्यांचा भाव वधारल्याचे चित्र दिसत आहे. 

      निसर्गाच्या उलट फेरमुळे कर्यात भागात नेहमी होणाऱ्या कुरीच्या पेरणी ऐवजी यंदा चिखलात रोप लावणीचा अनुभव घेण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment