सीए परीक्षा पास झाल्याबद्दल स्वप्निल पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी स्वप्नीलचे आई- वडील व उपस्थित मान्यवर.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
एखादे ध्येय समोर ठेवून प्रयत्न सुरू केले की कितीही वेळा अपयश आले तरी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठण्यात यश मिळतेच. अशीच काहीशी स्थिती कालकुंद्री (ता. चंदगड) येथील नुकत्याच चार्टर्ड अकाउंट (सीए) परीक्षा पास झालेल्या स्वप्निल वसंत पाटील याच्या बाबतीत घडली आहे.
नावाप्रमाणेच स्वप्नील याचे 'सीए' बनण्याचे स्वप्न होते. तथापि एक दोन नाही तर तब्बल चौदा वेळा परीक्षा देऊनही त्याच्या पदरी अपयश आले. पण त्याने जिद्द व चिकाटी सोडली नाही. आधीच्या चुका दुरुस्त करत प्रयत्नपूर्वक अभ्यास सुरूच ठेवला अखेर पंधराव्या प्रयत्नात त्याचे सीए बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. ही यशोगाथा स्वतःच्या शब्दात मांडली ती कालकुंद्री येथील तरुण स्वप्नील पाटील याने. अपयशाने खचून न जाता ध्येय कसे साध्य करावे याचे मूर्तिमंत उदाहरण त्याने इतर तरुणांसमोर उभे केले आहे.
स्वप्निलच्या यशाबद्दल गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय व ग्रामपंचायत यांच्या वतीने त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला. रा.ना.पाटील गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष के जे पाटील यांनी तर प्रस्ताविक प्रा डॉ व्ही आर पाटील यांनी केले.
सीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यात कोल्हापूर जिल्ह्यातील ४० विद्यार्थी- विद्यार्थिनींनी यश मिळवले होते. यात कालकुंद्री या एकाच गावचे दोन विद्यार्थी यशस्वी ठरले. त्यात विक्रम तुकाराम पाटील व स्वप्नील वसंत पाटील यांचा समावेश आहे. गावात यापूर्वी विविध क्षेत्रात अनेक उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या या अधिकाऱ्यांच्या गावात 'सीए' परीक्षा एकाच वेळी पास होण्याचा पहिला मान या दोघांना मिळाला. ११ जुलै २०२४ रोजी परीक्षेच्या निकालानंतर विक्रम याची गावात ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला होता. तथापि स्वप्नील त्या दिवशी उपलब्ध न झाल्याने त्याच्यासह आई वनिता व वडील वसंत पांडुरंग पाटील यांचा उपसरपंच संभाजी पाटील, सदस्य विलास शेटजी, प्रशांत मुतकेकर यांच्या हस्ते काल दि. १५ रोजी सत्कार करण्यात आला.
यावेळी वाचनालयाला वर्षभर एक वर्तमानपत्र देऊन सहकार्य केल्याबद्दल ऑडिटर अर्जुन वांद्रे (कोवाड) यांचाही सत्कार करण्यात आला.
चौदा वेळा अपयश येऊनही संयम व चिकाटी ठेवून यश कसे मिळवावे हे स्वप्निल कडून शिकावे. अशा प्रकारची मनोगते नारायण महादेव जोशी, विजय कोकीतकर, अर्जून पांडुरंग पाटील आदींनी व्यक्त केली.
यावेळी बहिण मयुरी पाटील, आजोबा पांडुरंग पाटील, कुदनूरचे कवी चंद्रकांत कोकीतकर, भरमू पाटील, दीपक कालकुंद्रीकर, वाचनालय सदस्य शिवाजी पाटील शिवाजी खवणेवाडकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पी एस कडोलकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment