कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
राज्यात मराठा आरक्षण साठी शासनाकडून जातनिहाय सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी काम केलेले प्रगणक मानधनाच्या प्रतीक्षेत होते. याप्रश्नी चंदगड तालुका सर्व संघटना कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने चंदगड तहसील कार्यालयाकडे याबाबत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त चंदगड तालुक्याचे मुखपत्र असलेल्या चंदगड लाईव्ह तथा सी. एल. न्यूज ने छायाचित्रासह प्रसिद्ध केले होते.
यावर झालेल्या चर्चेत सदरचे मानधन आठ दिवसात देण्याचे आश्वासन तहसीलदार राजेश चव्हाण, निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत आदी अधिकाऱ्यांनी संघटना पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्याची पूर्तता करत मानधनाची रक्कम १६ जुलै २०२४ रोजी चंदगड तालुक्यातील मराठा आरक्षण सर्वेक्षण पूर्ण केलेल्या प्रगणकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. हे मानधन पहिल्या टप्प्यातील असून उर्वरित प्रगणकांचे मानधन त्रुटी दूर करून लवकरच जमा करण्यात येणार आहे. गुंतागुंतीच्या या मानधन प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर करण्याची कामगिरी तहसील कार्यालयातील करवाळ मॅडम व स्टाफ ने केली.
या प्रश्नी चंदगड तालुका सर्व संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी शिवाजी पाटील, सदानंद पाटील, हंबीरराव कदम, गोविंद चांदेकर, महादेव सांबरेकर, बाबुराव परीट, सुभाष चौगले यांचा पाठपुरावा व गटशिक्षणाधिकारी भूषण पाटील व स्टाफ पंचायत समिती चंदगड यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment