महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते निंगोजी हुद्दार यांचे निधन, सीमा लढ्यातील बुलंद आवाज हरपला...! - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2024

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते निंगोजी हुद्दार यांचे निधन, सीमा लढ्यातील बुलंद आवाज हरपला...!

 

निंगोजीराव हुद्दार

कालकुंद्री : श्रीकांत पाटील/ सी एल वृत्तसेवा

          बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह सर्व मराठी सीमा भाग महाराष्ट्रात सामील व्हावा, यासाठी आयुष्यभर धडपडणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे जेष्ठ नेते निंगोजीराव हुद्दार (वय ८४) यांचे हंदिगनूर (तालुका जिल्हा बेळगाव) येथे राहत्या घरी वृध्दापकाळ व दीर्घ आजाराने निधन झाले. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. तसेच श्री सरस्वती हायस्कूल हंदिगनूर चेही अध्यक्ष होते.  बुधवार दि. १७ रोजी सकाळी ६-०० वाजता त्यांचे निधन झाले. हंदिगनूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुलगे, चार विवाहित मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

        बालपणापासूनच त्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सक्रिय सहभाग होता. सीमा प्रश्नासाठी  झालेल्या आंदोलनात त्यांनी कारावास देखील भोगला होता. यांच्या निधनाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड गेला असून मराठी मुलुख महाराष्ट्रात सामील करण्याचे त्यांचे स्वप्न अखेर अपूरेच राहिले. त्यांच्या जाण्याने या चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

       निंगोजीराव हे चंदगड तालुक्यातील कालकुंद्री गावचे जावई होते. त्यांना कालकुंद्री तसेच चंदगड तालुक्याबद्दल अतिशय आपुलकी व जिव्हाळा होता. त्यांनी तो अखेरपर्यंत जपला होता. 

      चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने सीमा लढ्यातील या योद्ध्याला अखेरचा सलाम...!

No comments:

Post a Comment