कागल / प्रतिनिधी
सेनापती कापशी (ता. कागल) येथे महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक साकारत आहे. पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या या स्मारकाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन पाहणी केली.त्यांच्या समवेत सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज उदयसिंह घोरपडे, कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती शशिकांत खोत, प्रसिद्ध वास्तु विशारद सौ. अमरजा निंबाळकर आदी उपस्थित होते. पुढच्याच महिन्यात या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ``शूरवीर महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे मराठी साम्राज्याचा अंगार होते. सेनापती कापशी येथे होत असलेले त्यांचे स्मारक बघण्यासाठी देशभरातील लोक येतील. या स्मारकासाठी अजून कितीही निधी लागू देत, तो कमी पडू दिला जाणार नाही. सरसेनापती संताजी घोरपडे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. अशा या महान मराठा योद्ध्याचे स्मारक पिढ्यान- पिढ्या प्रेरणादायी ठरेल, असेही ते म्हणाले.``
साधारणता १२ कोटी रुपये खर्चातून साकारत असलेल्या या स्मारकामध्ये प्रतिष्ठापना करण्यासाठी कोल्हापुरातील प्रसिद्ध शिल्पकार श्री. किशोर पुरेकर हा पुतळा साकारत आहेत. आतापर्यंत मुख्य स्मारक, सरसेनापती संताजी घोरपडे यांचा अश्वारूढ पुतळा, कंपाऊंड भिंत, बहुउद्देशीय हॉल, संग्रहालय, मुख्य स्मारक व कंपाऊंड भिंत, संग्रहालय, उर्वरित कंपाऊंड भिंत, पाणी पुरवठा व मलनिस्सारण, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, संग्रहालय इमारतीचे फर्निचर, हरित इमारत, पेविंग यांचा समावेश आहे.
यावेळी सरपंच सौ. उज्वला कांबळे, हसुर खुर्दचे माजी सरपंच अंकुश पाटील, आलाबादचे माजी सरपंच जोतीराम मुसळे, बाबासाहेब उर्फ पोपट सांगले, शामराव पाटील, डी. बी. कांबळे, सागर दुधाळे, सूर्यकांत भोसले, सुनील चौगुले आदी प्रमुखांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment