तिलारी घाटात भूस्खलनामुळे रस्त्याची अशी धोकादायक स्थिती झाली आहे. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
मुळातच धोकादायक असलेल्या तिलारी दोडामार्ग घाटात दोन दिवसांपूर्वी भूस्खलन झाल्याने रस्ता सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. १ जुलै ते ३१ ऑक्टोबर पर्यंत या घाटातून वाहतूक बंद करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी दिल्याने इकडे येणारी वाहने थांबली असली तरी आता भूस्खलनामुळे रस्ता नैसर्गिकरित्याच बंद होण्याच्या मार्गावर आहे.
तिलारी घाट रस्ता खचला आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी सुरक्षेसाठी उपाययोजना केली आहे. |
चंदगड, गडहिंग्लज, बेळगाव, निपाणी, संकेश्वर ते विजापूर पर्यंतच्या प्रवासी व वाहनधारकांना सिंधुदुर्ग, कोकण व गोव्यात जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असला तरी वाहतुकीस धोकादायक आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथील वाहतूक जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून थांबवली होती. परिणामी महाराष्ट्र, कर्नाटक घाटमाथ्यावरील प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार यांची गैरसोय झाली होती. हे लक्षात घेऊन चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी पालकमंत्र्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. यावेळी दोडामार्ग तालुक्यातील वीजघर, घाटीवडे येथील पुलाचे काम पूर्ण झाले की, एसटी बस सेवा सुरू केली जाईल असे सांगितले होते. त्यामुळे आंबोली घाटातून ५०-६० किलोमीटर जादाचा फेरा मारणाऱ्या दोडामार्ग, चंदगड, गोवा येथील प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला होता.
तिलारी घाटातून एसटी सुरू होईल या प्रतीक्षेत असताना आता घाटात भूस्खलन होऊन रस्ता खचला आहे. अतिवृष्टीमुळे सद्यःस्थितीत येथे दुरुस्तीचे काम करणे अशक्य असल्याने वाहतुकीची शक्यता मावळली आहे. दरम्यान भूस्खलन झालेल्या ठिकाणी चंदगड बांधकाम विभागाने सावधानतेचा इशारा देणाऱ्या उपायोजना केल्याचे दिसते. मोठ्या प्रमाणात झालेल्या व होत असलेल्या भूस्खलनामुळे एसटी लवकर सुरू होईल आपली सोय होईल या आशेवर बसलेल्या नागरिकांना मात्र मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
No comments:
Post a Comment