कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
"चोरी दरोड्याच्या घटनेतील चोर व इतर घटनांतील गुन्हेगार तात्काळ जेरबंद होणार, ग्रामसभा व विविध सरकारी योजनांची माहिती ग्रामस्थांना तात्काळ मिळणार, हे शक्य होणार आहे गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे...!" असे प्रतिपादन डी के गोर्डे- पाटील (संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा महाराष्ट्र) यांनी केले. ते महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर, एस कार्तिकेयन मुख्य कार्यकारी अधिकारी जिप. कोल्हापूर यांच्या प्रयत्नांतून तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ग्राम सुरक्षा यंत्रणा' कार्यान्वित करण्यासाठीच्या प्रशिक्षण वर्गात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. हे एक दिवशीय प्रशिक्षण सोमवार दि. २२/०७/२०२४ रोजी तहसील कार्यालय सभागृह चंदगड येथे पार पडले.
यावेळी बोलताना गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण असून आपला गाव सुरक्षित ठेवण्यासाठी या यंत्रणेचा दक्षतापूर्वक वापर करावा. 'आपला गाव आपली जबाबदारी' या घोषवाक्यानुसार प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी असे सांगितले. राजेश चव्हाण तहसीलदार चंदगड यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो असे सांगितले. चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील म्हणाले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करून या यंत्रणेचा नियमित प्रभावीपणे वापर करावा. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत फायदा तसेच महत्त्वाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत एकाच वेळी व कमीत कमी वेळेत पोहोचू शकते.
यावेळी उपस्थित तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, सर्व दुकानदार, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, तलाठी, कोतवाल, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार आदींना यंत्रणेबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास गणेश लोकरे (वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा), विक्रमसिंह घाटगे (जिल्हा समन्वयक ग्राम सुरक्षा यंत्रणा), बाळासाहेब भोगे (गटविकास अधिकारी चंदगड), हेमंत कामत (नायब तहसीलदार), दत्तात्रय टोपे (लेखापरीक्षक नगरपंचायत चंदगड), दिगंबर गायकवाड (गोपनीय अंमलदार) आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात संकटग्रस्त व्यक्तीने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर *18002703600/ 9822112281* वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. यावेळी उपस्थितांनी या यंत्रणेमध्ये ४८ तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ५० रुपये प्रति कुटुंब, प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे. सदर खर्चाची १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करणेबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत. गेल्या १४ वर्षांत पुणे, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५०० हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाली आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
*ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट*
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
गावातील कार्यक्रम / घटना विनाविलंब नागरिक/ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे. अफवांना आळा घालणे.
प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.
*ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये*
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600/9822112281
यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात
नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.
घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही,तोपर्यंत रिंग वाजते.
संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.
गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य.
No comments:
Post a Comment