ग्राहकांना शेती, व्यवसाय, बचत गट, गृह कर्ज मंजुरीची पत्रे प्रदान, कोवाड येथे बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहक मेळावा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2024

ग्राहकांना शेती, व्यवसाय, बचत गट, गृह कर्ज मंजुरीची पत्रे प्रदान, कोवाड येथे बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहक मेळावा संपन्न


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

   बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने कोवाड, ता चंदगड येथे २४ जुलै २०२४ रोजी झालेल्या ग्राहक मेळाव्याला परिसरातील व्यापारी, शेतकरी, बचत गटातील महिला व ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला. तालुक्यातील कोवाड, तुर्केवाडी व अडकूर या तीन शाखांच्या वतीने हा मेळावा भरवण्यात आला होता.

   बँकेच्या जनरल मॅनेजर श्रीमती सुनिता दुर्गा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत बँकेचे कोवाड शाखाधिकारी भूषण बागुल यांनी केले. प्रास्ताविक नियोजन अधिकारी धनंजय निलेवाड यांनी केले. बँकेकडून मिळणाऱ्या कृषी संबंधित कर्जांचा लाभ कसा घेता येईल याबाबतची माहिती कृषी विभागाचे विभागीय अधिकारी किशोर पाटील यांनी दिली. तर व्यावसायिक व इतर कर्जांचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबद्दल बँकेचे शाखाधिकारी भूषण बागुल यांनी दिली. सीपीसी इन्चार्ज नितीन सर्वगोड यांनी बँकेचे विविध प्रॉडक्ट व ग्राहक योजनांची माहिती दिली. यावेळी बोलताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम यांनी गेल्या ३-४ वर्षांत बँकेचे कोवाड शाखाधिकारी कुलदीप चौगुले यांनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यामुळे देशातील ग्रामीण विभागात कोवाड शाखेने दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यांची रत्नागिरी येथे बदली झाल्यानंतर आलेले नूतन मॅनेजर भूषण बागुल यांनीही आपल्या ग्राहकाभिमुख कार्यशैलीने चौगुले यांचा वारसा पुढे चालवला आहे. असे गौरवोद्गार काढले. यावेळी अडकूरच्या शाखाधिकारी उज्वला खेडेकर व तुर्केवाडी शाखाधिकारी राजू कांबळे यांची भाषणे झाली.

   ग्राहक मेळाव्याच्या निमित्ताने कोवाड शाखेमार्फत गृह, व्यावसायिक, शेती व बचत गट कर्जांची ८६ लाख रुपयांची तर तुर्केवाडी शाखेमार्फत ४५ लाख रुपयांची प्रकरणे मंजूर करण्यात आली. ही पत्रे सुनिता दुर्गा यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आली. यावेळी एम व्ही पाटील, आर एस देसाई यांच्यासह शेतकरी, व्यावसायिक, बचत गटांच्या महिला व ग्राहक उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकाभिमुख विविध योजनांचा लाभ तालुक्यातील ग्राहकांना सुलभ रीत्या होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत होते.

कार्यक्रमाचे नियोजन कोवाड शाखेमार्फत करण्यात आले. या कामी शाखेतील सुधीर पाटील, संदीप पाटील, शहाजी कांबळे, राजेंद्र देसाई, बी के कोरवी, परशराम कांबळे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment