अतिवृष्टीने बुक्कीहाळ येथे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान, म्हैस जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2024

अतिवृष्टीने बुक्कीहाळ येथे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान, म्हैस जखमी

बुक्कीहाळ खुर्द येथील चंद्रकांत कृष्णा बिर्ज यांचे अतिवृष्टीने जमीनदोस्त झालेले घर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 
     अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे बुक्कीहाळ खुर्द (ता. चंदगड) येथील चंद्रकांत कृष्णा बिर्जे यांचे राहते घर कोसळून सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. घरातील कुटुंबातील सदस्य वेळीच बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेत घरातील जनावरापैकी एक म्हैस जखमी झाली आहे. ही घटना आज २६ जुलै २०२४ रोजी सकाळी दहा वाजता घडली. 
      घरातील व गावातील लोकांची शेताकडे जायची घाई चालू असताना  चंद्रकांत बिर्जे यांच्या पत्नी सुरेखा माळ्यावर असलेल्या स्वयंपाक खोलीत भाकरी करत होत्या. याचवेळी मोठा आवाज करत भिंत कोसळली. जीवाच्या आकांताने घाबरून त्यांनी वरून उडी मारून आपला जीव वाचवला. त्यांचा आरडाओरडा व घर कोसळल्याच्या आवाजाने ग्रामस्थ घटनास्थळी धावले.  त्यांनी गोठ्यात बांधलेली जनावरे बाहेर काढली तथापि एक म्हैस जखमी झाली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यावेळी गावचे सरपंच जोतिबा मारुती बिर्जे व ग्रामस्थांनी सहकार्य करून या कुटुंबाची श्री भागुबाई विकास सेवा संस्थेत राहण्याची सोय केली आहे. डोंगर कपारीत वसलेल्या बुक्कीहाळ खुर्द येथील या आपद्ग्रस्त गरीब कुटुंबाला शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान महापुरामुळे तलाठी व ग्रामसेवक उपलब्ध न झाल्यामुळे घटनेचा पंचनामा होऊ शकला नसल्याचे समजते.

No comments:

Post a Comment