कोल्हापूरचे वैभव केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भस्मस्थानी...!, -महाराष्ट्र केसरी पै विष्णू जोशीलकर यांचे भावनिक आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2024

कोल्हापूरचे वैभव केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भस्मस्थानी...!, -महाराष्ट्र केसरी पै विष्णू जोशीलकर यांचे भावनिक आवाहन



चंदगड : सी एल वृत्तसेवा

     १९१२ साली कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जागतिक दर्जाचे कुस्तीमैदान व केशवराव भोसले नाट्यगृह उभारले. ११२ वर्षे अविरत सेवा देणाऱ्या या ऐतिहासिक वास्तू गुरूवार  दि.८ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री आगीत भस्मसात झाल्या. हे  प्रत्यक्ष पाहून काळीज पिळवटून गेलं. अत्यंत वाईट आणि दुर्दैवी  घटना आज कोल्हापुरामध्ये घडली आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर एकेकाळी कुस्ती मैदाने गाजवलेले महाराष्ट्र केसरी मल्ल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, वस्ताद, सिने कलाकार व चंदगडचे सुपुत्र पैलवान विष्णू जोशीलकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे सर्वांना भावनिक आवाहन केले आहे.

        कोल्हापूरात राजर्षी छत्रपतींनी ज्या उमेदीने कुस्तीगीर, नाट्य व चित्रपट कलाकार घडवण्यासाठी ही ऐतिहासिक वास्तू उभी केली होती. या वास्तूशी छत्रपती घराण्याचे फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत. छत्रपतींनी, ही वास्तू त्यावेळी आपल्या संस्थानामार्फत उभी केली होती.  राजर्षी छत्रपतींचे स्मारक जिवंत ठेवायचे असेल त्यांच्या ईच्छा व कार्य पूर्वी प्रमाणेच पुढे न्यायचे असेल तर कोल्हापूर व कोल्हापुरातून घडून गेलेल्या तमाम कुस्तीगीर, कलाकार व जनतेला मी आवाहन करतो की, ही ऐतिहासिक वास्तू आपण पुन्हा उभी करूया. आपण समाजाचे काय तरी देणे लागतो या भावनेन ही वास्तू  व ऐतिहासिक स्मारक उभा करण्यासाठी सर्व जनतेने पुढाकार घेतला पाहिजे.

विष्णु जोशिलकर

   शासन आपल्या पद्धतीने हे काम करीलच परंतु आपलेही काही कर्तव्य आहे. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून  मी आपल्या आजी माजी कुस्तीगिराना विनंती करतो आहे की, आपण येत्या जानेवारीमध्ये देशातील सर्व नामांकित मल्लांना या मैदानाच्या मदतीकरिता पाचारण करून कुस्तीचे भव्य मैदान आयोजित करू. त्या मैदानातून मिळणारे सर्व उत्पन्न महानगरपालिकेकडे सुपूर्द करूया. त्याचबरोबर सिने व नाट्य कलाकारांनी पण असे कार्यक्रम करून त्या माध्यमातून जमा होणारा निधी महानगरपालिकेकडे जमा करावा . त्याचबरोबर सर्व पक्ष्यांचे नेते आजी-माजी आमदार खासदार यांनी पण पुढाकार घेऊन आपापल्या परीने आपला निधी या मैदानासाठी व नाट्य गृहासाठी द्यावा.  कोल्हापूरचा मान, शान व सन्मान असलेल्या छत्रपतींच्या या वस्तूला गतवैभव प्राप्त करून  देऊया. अशी मी सर्वांना कुस्तीगीर या नात्याने नम्र विनंती व आवाहन करत आहे. 

    -शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र केसरी, पैलवान व वस्ताद विष्णू जोशीलकर, कोल्हापूर.


No comments:

Post a Comment