विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आता चंदगडात ....! प्रांताधिकारी व तहसीलदारांकडून होणार जागांची पाहणी - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2024

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आता चंदगडात ....! प्रांताधिकारी व तहसीलदारांकडून होणार जागांची पाहणी

  

प्रांत कार्यालय गडहिंग्लज येथे मतमोजणीबाबत चर्चा करताना प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या समवेत आंदोलन कर्ते व विविध पक्षांचे नेते.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    'चंदगड' विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतरची मतमोजणी गडहिंग्लज मध्ये केली जाते. त्याऐवजी ती चंदगड मध्येच झाली पाहिजे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हळदणकर यांनी १५ ऑगस्ट पासून तहसील कार्यालय चंदगड समोर तब्बल १० दिवस उपोषण केले होते. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीनंतरची मतमोजणी चंदगड मध्ये घेण्यासाठी योग्य ठिकाण पाहून तसा प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाला पाठवला जाईल. त्या संदर्भात सर्वपक्षीय नेते व प्रांताधिकारी यांची लवकरच संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन दिले होते. आंदोलनकर्ते हळदणकर यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसमोर दिले होते. त्यास अनुसरून मल्लिकार्जुन माने प्रांताधिकारी गडहिंग्लज, राजेश चव्हाण तहसीलदार चंदगड, आंदोलक बाळासाहेब हळदणकर व राजकीय नेत्यांची संयुक्त बैठक प्रांताधिकारी कार्यालय येथे काल दि २७/०८/२०२४ रोजी पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर गडहिंग्लज ऐवजी चंदगड येथे मतमोजणी करणे बाबत एकमत झाले आहे. ही मतमोजणी कोणत्या ठिकाणी करावी याबाबत चंदगड मधील संभाव्य चार-पाच जागांची पाहणी करून त्यापैकी योग्य ठिकाण येत्या काही दिवसात लवकरच निश्चित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे समजते. या बैठकीस नंदाताई बाभुळकर, गोपाळराव पाटील, संभाजीराव शिरोलीकर, नागेश चौगुले, सिताराम नाईक, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment