'स्वच्छ सुंदर बस स्थानक' अभियानांतर्गत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना चंदगडचे प्रभारी आगार व्यवस्थापक सुरेश शिंगाडे व अन्य अधिकारी
चंदगड : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत राज्यभर 'हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान' राबवण्यात आले होते. यातील पुणे प्रादेशिक विभागातील 'ब' गटात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आगाराने तृतीय क्रमांक पटकावला.
नूतन आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांचे अभिनंदन करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील अनिल धुपदाळे व संपत पाटील |
स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच सातारा येथे पार पडला. त्यावेळी महामंडळाकडून आगाराला प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व दीड लाख रुपयांचा धनादेश बक्षीस स्वरूपात प्रदान करण्यात आला. चंदगड आगाराचे प्रभारी व्यवस्थापक सुरेश शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बक्षिस स्वीकारले. यावेळी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, यंत्र अभियंता कानतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील सर्व बस स्थानके स्वच्छ सुंदर रहावीत यासाठी 'आपले गाव आपलं बस स्थानक' या संकल्पनेवर आधारित सन २०२३-२४ मध्ये हे अभियान राबवण्यात आले होते. या माध्यमातून बस स्थानक स्वच्छ्ता, परिसर सुशोभीकरण, बस गाड्यांची स्वच्छता, प्रवासी सेवेचा दर्जा उंचावणे आदी मुद्द्यांच्या आधारे परीक्षण करण्यात आले होते. या अभियानांतर्गत बक्षीस पटकावण्यासाठी तत्कालीन आगार व्यवस्थापक अमर निकम, विजयसिंह शिंदे, वासंती जगदाळे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, वाहक, चालक, तंत्रज्ञ, वर्कशॉप कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले होते. या यशाबद्दल विद्यमान आगार व्यवस्थापक व सहकाऱ्यांचे चंदगड तालुक्यातील प्रवासी व विविध संघटनांच्या वतीने अभिनंदन होत आहे.
या यशाबद्दल चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने केवळ चार दिवसांपूर्वीच रुजू झालेले तरुण व धडाडीचे विद्यमान आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांचे दि. २७/०८/२०२४ रोजी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी चंदगड आगार उत्पन्नाच्या बाबतीत एकेकाळी महाराष्ट्रात नंबर एक म्हणून गणले जात होते. तथापि गेल्या पंधरा वर्षात अनेक कारणांनी आगाराचे उत्पन्न खालावल्याचे समजते. ते आपल्या नियोजनबद्ध व्यवस्थापनाने पुन्हा प्रथम क्रमांकावर यावे. अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी तालुक्यातील विविध मार्गांवर सुरू असलेल्या बस फेऱ्या, गरजेच्या फेऱ्या, उत्पन्न, वाहक, चालक, वर्कशॉप कर्मचारी बसची संख्या व गरज याबाबत चर्चा झाली. विविध मार्गांचा अभ्यास करून तालुक्यातील पत्रकार व आगारातील कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन उत्पन्न कसे वाढवता येईल, याबाबत चर्चा करणार असल्याचे सतीश पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी पत्रकार अनिल धुपदाळे व सी एल न्यूजचे संपादक संपत पाटील आदी पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment