होसूर घाटात भीक मांगो आंदोलन करणारे कार्यकर्ते व दूरावस्था झालेला रस्ता
चंदगड : सी एल वृत्तसेवा
अनेक वेळा भीक मांगो, रास्ता रोको अशी आंदोलने करूनही खड्डे आणि वाटमारी मुळे चर्चेत असलेल्या कोवाड- बेळगाव राज्य मार्गावरील होसूर ( ता चंदगड) घाट रस्त्याची दुरावस्था कायम आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार? असा सवाल प्रवासी व वाहनधारकांकडून होत आहे. तर दुरावस्थेतील हा भाग कर्नाटक हद्दीत येत असल्यामुळे कर्नाटक शासनाला रस्ता करणे शक्य नसेल तर हा भाग महाराष्ट्राच्या स्वाधीन करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
होसूर घाटातील महाराष्ट्र हद्द ते बेळगाव कर्नाटकातील अतिवाड फाटा हा सुमारे अर्धा किमी लांबीचा रस्ता गेली सुमारे २०-२५ वर्षे दुरावस्थेत आहे. दोन्ही कडील लोकप्रतिनिधींना अर्ज विनंती करूनही झाल्या. विविध वृत्तपत्रातून गेली अनेक वर्षे आंदोलनाच्या बातम्या झळकत आहेत. तरी आश्वासना पलीकडे काही मिळालेले नाही, हा भाग आजतागायत दुर्लक्षित राहिला आहे. चार-पाच वर्षांपूर्वी पर्यंत येथे रात्रीच्या वेळी दुचाकी गाड्या अडवून वाटमारी चे प्रकार घडत, एका दुचाकी स्वारावर तलवार हल्लाही झाला होता. तेव्हा घाटात लाईटची व्यवस्था व पोलीस पहारा देण्याची मागणी झाली होती. सध्या येथे हॉटेल व्यवसायामुळे वर्दळ वाढल्याने वाटमारीचे प्रकार कमी झाले आहेत. हा रस्ता वैजनाथ डोंगर रांगांचा भाग असल्यामुळे येथे हत्ती, गवे, बिबट्या, तरस, डुक्कर, लांडगे अशा वन्य व हिंस्त्र प्राण्यांचा वावर नेहमी असतो. त्याचाही अनेक प्रवासी व दुचाकीधारकांना फटका बसला आहे. ही सर्व संकटे झेलत रस्त्यातील खड्ड्यांतून जीव मुठीत घेऊनच सायंकाळ पासून ते सकाळ पर्यंतचा प्रवास करावा लागतो. गारगोटी, मुरगुड, गडहिंग्लज, आजरा, नेसरी, कोवाड परिसरातून बेळगाव कडे या मार्गाने वाहतूक होते. लहान-मोठी हजारो वाहने येथून रोज ये जा करतात.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेळगाव- वेंगुर्ला राज्य मार्ग व होसूरघाटातील रस्ता प्रश्नी शिनोळी येथे दोन दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हा रस्ता करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. याचे पालन कितपत व केव्हा होते याकडे प्रवासी व वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गतवर्षीच्या पावसाळ्या अखेरीस कागणी येथील महादेव जांभळे, पुरूषोत्तम सुळेभावकर, श्रीधर देसाई, गोवर्धन पुजारी, प्रवीण खाडे, माजी सैनिक बाळू बाचुळकर, अभी कोरे, अभि भोगण, प्रकाश आपटेकर, कल्लापा परीट, पांडू बोंद्रे, मोहन सुळेभावकर आदी आंदोलकांनी येथून जाणाऱ्या वाहनधारकांकडून भीक मांगो आंदोलन केले होते. यातून जमलेल्या निधीतून खडी टाकून जेसीबी द्वारे खड्डे मुजवण्याचा प्रयत्न केला होता. तरीही शासनकर्त्यांचे डोळे उघडले नाहीत.
No comments:
Post a Comment