डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी पिंपरी चिंचवड येथे २१ सप्टेंबर रोजी प्रशिक्षण...! मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2024

डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी पिंपरी चिंचवड येथे २१ सप्टेंबर रोजी प्रशिक्षण...! मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम

 


चंदगड : श्रीकांत पाटील / सी. एल. न्यूज

   अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने २० सप्टेंबर २०२४ रोजी पिंपरी- चिंचवड येथे डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल मिडियातील राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ मान्यवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत.

     हे शिबीर डिजिटल मिडिया क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. अशी कार्यशाळा महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याने डिजिटल मिडियाच्या राज्यातील सर्व पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केले आहे.

      प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया नंतर आता डिजिटल मिडियाचं युग आलं आहे. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तरी राज्यात ५ हजार पेक्षा जास्त युट्यूब चॅनल्स चालविले जातात. सुमारे १० हजार पेक्षा जास्त पत्रकार या क्षेत्रात कार्यरत आहेत. तथापि पुरेशा तांत्रिक माहिती अभावी बहुतेकजण व्यावसायिकदृष्टया अयशस्वी ठरतात. ही गोष्ट अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या लक्षात आल्याने परिषदेने वर्षभरात राज्यातील विविध भागात अशा पाच कार्यशाळा घेण्याचे नियोजन केले आहे. या कार्यशाळेतून मान्यवरांचे मार्गदर्शन सखोल मार्गदर्शन मिळाल्याने या क्षेत्रातील शिबिरात उपस्थित राहणारे पत्रकार व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरतील याची खात्री आहे.

      यातील पहिली कार्यशाळा  पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात होणार असून यावेळी दिल्ली, लखनौसह महाराष्ट्रातील अनेक नावाजलेले तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

    यामध्ये युट्यूब कसे सुरू करायचे, ते कसे चालवायचे, गुगलकडून जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कसे मिळवायचे, डिजिटल माध्यमाबद्दलची सरकारी भूमिका, नियम यासह विविध तांत्रिक बाबींचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन शिबिरात करण्यात येणार आहे. शिबिरात केवळ ३५० पत्रकारांनाच प्रवेश दिला जाणार असल्याने २००₹ प्रवेश शुल्क भरून आपली नोंदणी करावी. प्रवेश शुल्कातून उपस्थित पत्रकारांना नाश्ता, दुपारचे जेवण व सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

     शिबिरात डिजिटल मिडियाची राज्य कार्यकारिणीही निवडली जाणार असल्याने संघटनात्मक कार्याची आवड असलेल्या इच्छुकांना नेतृत्वाची ही संधी मिळणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई, डिजिटल मिडिया पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य उपाध्यक्ष संतोष उर्फ सनी शिंदे, विभागीय सचिव गणेश मोकाशी, पिपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, पिपरी चिंचवड डिजिटल मिडियाचे अध्यक्ष महावीर जाधव आदिंनी केले आहे.

No comments:

Post a Comment