चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
युगपुरुष शिवश्री इंजिनिअर ॲड. पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी मराठा समाजाचा इतिहास आणि भविष्याचा वेध घेऊन मराठा-कुणबी सह सर्व बहुजन समाजाला संघटीत करणे, या समाजात प्रबोधन व जागृती करण्याच्या उदात्त हेतूने शासकीय व अन्य क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने दि.०१ सप्टेंबर १९९० रोजी अकोला येथे 'मराठा सेवा संघ' या संघटनेची स्थापना केली.
गत ३४ वर्षापासून मराठा सेवा संघ संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशात पोहोचून समाज बांधवांचे मन, मस्तक, मेंदू, मनगट व मणका मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मातृतीर्थ सिंदखेड राजा, जि. बुलडाणा येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या जन्मगावी स्वमालकीच्या सुमारे १०० एकर क्षेत्रावर लोकवर्गणी व देणगीतून जवळपास ११०००/- कोटी रुपये खर्चाचे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ 'जिजाऊसृष्टी' प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. राज्यभर अनेक जिल्ह्यांत विद्यार्थ्यांकरिता वस्तीगृह, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, वाचनालये, बँका, पतसंस्थासह नागपूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बळीराजा संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा काळानुरूप बदलवण्यासाठी तसेच सद्यस्थितीला अनुरूप विधायक विचारांची मानसिकता तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यात उद्या अनेक ठिकाणी विविध विधायक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
उद्या रविवार दि १ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता सौ वि. खं. माने कन्या माध्यमिक विद्यालय, कुरूंदवाड येथे विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व व्याख्यान आयोजित केले असून यावेळी प्रदेश संघटक संजय देसाई, विभागीय अध्यक्ष अश्विन वागळे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ.राजीव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी केले आहे.
तर राष्ट्रमाता जिजाऊ अकॅडमी, शाहूजी महाराज नगर वासनोली रोड, कडगाव, ता भुदरगड येथे विविध क्षेत्रात लौकिक मिळवलेल्या बहुजन समाजातील विद्यार्थी व व्यक्तींचा सन्मान कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे संयोजक मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रवक्ता शहाजी देसाई यांनी सर्व बहुजन मराठा बंधू भगिनी यांनी सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
मराठा सेवा संघ कोल्हापूर महानगर शाखेच्या वतीने उद्या सकाळी ११ वाजता मिरजकर तिकटी कोल्हापूर येथे अंध मुलांसाठी खाऊ वाटप चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे आयोजन महानगराध्यक्ष राहुल रावसाहेब इंगवले यांनी केले आहे.
मराठा सेवा संघ भुदरगड तालुका यांच्या वतीने गारगोटी येथील के डी देसाई हॉल, के डी देसाई नगर येथे दुपारी ११.३० वाजता मराठा बहुजन बांधवांसाठी स्नेह मेळाव्याचे अजून करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांना मराठा समाजातील बंधु भगिनी तसेच मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय शिक्षक परिषद आदी ३२ कक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment