चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना शासन स्तरावरून विविध योजना येतात. त्या परस्पर लाटल्या जात आहेत. तालुक्यातील राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधी आपल्या बगल बच्च्यांच्या मदतीने आपल्या मर्जीतील बोगस कामगारांना या योजनांचा लाभ देत आहेत. असा आरोप करत याची चौकशी होऊन खऱ्या कामगारांना न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे चंदगड विधानसभा मतदारसंघ प्रमुख नारायण वाईंगडे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच तहसीलदार चंदगड यांना देण्यात आले आहे.
![]() |
नारायण वाईंगडे |
बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आहेत. तथापि या योजनांचा लाभ खऱ्या कामगारांना न देता काही नेतेमंडळी व एजंट आपल्या राजकीय व शासकीय ओळखीचा गैरवापर करून कष्टकरी कामगारांच्या तोंडातील घास काढून तो मर्जीतील लोकांना देण्यासाठी परस्पर लाटत आहेत. हे लाभ ज्यांच्या सहीने दिले गेले त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच ज्यांनी हे लाभ चुकीच्या पद्धतीने लाटले आहेत त्यांच्याकडून घेतलेले लाभ सक्तीने वसूल करावेत व संबंधित चोरांवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा प्रशासन सुद्धा बांधकाम कामगारांच्या योजना पळवणाऱ्यांना साथ देत आहे, असे समजून प्रशासनाच्या विरोधात किंवा पाटणे फाटा येथे दि ९ ऑगस्ट २०२४ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे शेकापचे कार्यकर्ते नारायण रामू वाईंगडे (कुमरी, ता गडहिंग्लज) आदींनी दिला आहे. याबरोबरच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी केलेल्या मागण्या शासनाने लवकर मान्य कराव्यात अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment